नागपूर
काँग्रेस पक्षाच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त (139th Foundation Day of Congress Party) नागपुरात “है तैय्यार हम” महारॅली आयोजित करण्यात आलीय. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांकडून निधी संकलनाकरिता काँग्रेसने अनोखी शक्कल लढवली आहे. या रॅलीतील प्रत्येक खुर्चीच्या मागच्या बाजूला ‘क्यूआर-कोड’चे स्टीकर्स लावण्यात आले होते.
उमरेड मार्गावरील सभास्थळी भव्य असे 3 स्टेज उभारण्यात आलेत. स्टेजवर 620 खुर्च्या ठेवण्यात आल्यात. यासोबतच सभास्थळी मोठ्या प्रमाणात आसनव्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील प्रत्येक खुर्च्यांवर क्युआर कोड लावण्यात आले आहे. या महारॅलीच्या निमित्ताने 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने पक्षनिधीसाठी तयारीला सुरुवात केली असल्याचे दिसून आले. यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे पार्टी क्राऊड फंडिग राबवत ‘डोनेट फॉर देश’ ही मोहीम हाती घेतली होती.
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी निधी उभारण्यासाठी काँग्रेसने 18 डिसेंबरला डोनेट फॉर देश मोहीम सुरू केली. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्ताने 138 रुपये, 1380 रुपये, 13,800 रुपये किंवा या रकमेच्या 10 पट रक्कम 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींकडून जमा करण्याचे आवाहन काँग्रेसने केले होते. या मोहिमेत स्वत: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या अभियानाचा शुभारंभ करताना 1 लाख 38 हजार रुपयांची देणगी दिली. आज त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात हे क्युआर कोड लावण्यात आले आहेत.
मोठी बातमी! नागपुरातील काँग्रेसच्या स्थापना दिन सोहळ्याला प्रियंका आणि सोनिया गांधी अनुपस्थितीत!
आतापर्यंत ही मोहीम ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली होती. मात्र, आज काँग्रेसच्या स्थापना दिनानंतर काँग्रेस कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना किमान 138 रुपये देणगी देण्याची मागणी करणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या मोहिमेविषयी बोलताना म्हणाले होते की, पक्ष पहिल्यांदाच देशासाठी देणगी मागत आहे. जर आपण श्रीमंत लोकांवर अवलंबून राहिलो तर, आपल्याला त्यांची धोरणे स्वीकारावी लागतील. महात्मा गांधींनीही स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकांकडून देणग्या घेतल्याचे खर्गेंनी सांगितले.