X: @therajkaran
काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचा विश्वास….!
आगामी निवडणुका देशातील लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाच्या असून सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्रात काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवू,असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
आज देशासमोर धर्मांधशक्तींचे मोठे आव्हान असून आगामी निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल असे सांगतानाच, प्रभारी चेन्नीथला म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुका देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत, देश तोडणाऱ्या शक्तींच्या विरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.भाजपा सरकार विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी ईडी,सीबीआयचा गैरवापर करत आहे. एकीकडे रामाच्या नावावर निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे आरक्षणावरून समाजा-समाजात भांडणे लावत आहेत.मात्र आज देशासमोर महागाई,बेरोजगारी, शेतकरी,सामाजिक सद्भाव यासारखे मुद्दे महत्वाचे असून निवडणुकीत या मुद्द्यांवरही काँग्रेस पक्ष भर देईल.तसेच जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये एक बैठक झाली असून दुसरी बैठक लवकरच होईल व त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय होईल,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोणावळ्यात काँग्रेसचे महत्वाचे शिबिर……..
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे शिबीर लोणावळा येथे १७ व १८ फेब्रुवारीला आयोजित केले असून या शिबाराचे उद्घाटन खासदार राहुल गांधी ऑनलाईन करतील व समारोप राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे करणार आहेत.या शिबिराला राज्यातील ३०० महत्वाचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
काँग्रेस व मविआसाठी राज्यात चांगले वातावरण……
कर्नाटकात भाजपाने तोडफोड करुन सरकार बनवले पण जनतेने निवडणुकीत भाजपाचा पराभव करत पुन्हा काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले.महाराष्ट्रातही ईडी,सीबीआयचा गैरवापर करून पक्षांची फोडाफोड करून सरकार बनवले असून आगामी निवडणुकीत जनता भाजपाला कर्नाटकाप्रमाणेच त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.त्याचवेळी महाराष्ट्रात काँग्रेस व महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून जास्तीत जास्ता जागांवर काँग्रेस व महाविकास आघाडी विजयी होईल असे भाकीतही चेन्नीथला यांनी यावेळी बोलताना वर्तविले.