X: @vivekbhavsar
मुंबई: खानदेशातील चारपैकी धुळ्याची जागा सर्वाधिक चर्चेत आली आहे ती माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळणार की नाही यावरून. मात्र त्याहीपेक्षा भाजप आणि काँग्रेसला निवडून येईल असा उमेदवार मिळत नसल्याच्या कारणावरून ही धुळे लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या एकत्रित धुळे जिल्ह्यात काँग्रेस जवळपास नामशेष झाली आहे. त्यामुळे धुळ्याची जागा उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेला सोडण्यावर काँग्रेसचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीतून आज संध्याकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार अमरीश पटेल यांना भाजपडून उमेदवारी दिली जाऊ शकेल. सक्षम मराठा उमेदवार नसेल तर काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी द्यायची या निर्णयाप्रत राज्यातील भाजप नेते आले होते. मात्र, अद्यापि कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेश करण्यास संमती दिलेली नाही.
दुसरीकडे काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि अन्य एक नेत्याचे नाव पुढे केले गेले. मात्र सनेर यांनी गेल्या पंधरा वर्षांत असंख्य निवडणुकीत पराभव पत्करला असल्याने काँग्रेस पुन्हा रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाही. काँग्रेसने कुणाल पाटील यांना विचारणा केली होती, मात्र त्यांना लोकसभेपेक्षा विधानसभा अधिक प्रिय असल्याचे सांगण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर आपल्याला मंत्रिमंडळात योग्य स्थान मिळेल, असा विश्वास त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला होता.
काँग्रेस आणि भाजपने केलेल्या सर्वेक्षणात कुणाल पाटील लोकसभेत निवडून येतील असेच निष्पन्न झाले होते. मात्र, त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची नसल्याने काँग्रेसने उमेदवाराचा शोध थांबवला आहे आणि ही जागा उद्धव सेनेला सोडायचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेकडून माजी आमदार प्रा शरद पाटील यांच्या नावाला महविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रसने आणि आमदार कुणाल पाटील यांनीही पाठिंबा दिल्याने ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे स्वतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेऊन प्रा पाटील यांना सेनेची उमेदवारी दिल्यास काँग्रेस त्यांच्यासाठी काम करेल असा शब्द देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धुळे लोकसभा हा मराठा समाजाचा बालेकिल्ला समजला जातो. एकट्या धुळे विधानसभा मतदारसंघात ८० हजार मराठा समाज आहे. याशिवाय वैयक्तिक संबंधामुळे धुळे आणि मालेगावातील मुस्लिम मतदार प्रा शरद पाटील यांच्यामागे उभा राहील. शिंदेखेडा विधान सभा मतदारसंघातही प्रा पाटील यांना आघाडी मिळेल अशी चर्चा भाजपमध्येही आहे.
भाजपकडून अमरीश पटेल उमेदवार असतील तर धन शक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होईल आणि यात धुळे लोकसभेच्या माध्यमातून खानदेशातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची पताका लोकसभेत फडकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Also Read: उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम