नंदूरबार : नंदूरबार लोकसभा मतदारसंघात हिना गावित या हॅट्रिक करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. राज्यात अनेक मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार बदलणार, अशी चर्चा असली तरी हिना गावित यांची उमेदवारी मात्र सुरक्षित असल्याचं मानण्यात येतंय. स्थानिक भाजपात त्यांच्याविरोधात धुसफूस असली तरी पर्यायी उमेदवार पक्षाकडे नाही. विजयकुमार गावित आणि हिना गावित यांचा मतदारसंघातील जनसंपर्कही मोठा असल्यानं पुन्हा त्यांनाच यावेळीही तिकिट दिली जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.
मतदारसंघात काय स्थिती
मुळात या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे मोठा उमेदवार नाही. पुन्हा एकदा माजी मंत्री एडवोकेट के सी पाडवी यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत के सी पाडवी यांचा हिना गावित यांनी सुमारे 95 हजार मतांनी पराभव केला होता.
के सी पाडवी यांच्या प्रचाराचं नियोजन करणारे शिरपूरचे अमरिश पटेल सध्या भाजपात गेल्यानं, पाडवी यांना उमेदवारी मिळूनही फारसा लाभ होणार नाही, असंच दिसतंय. २०१९ च्या निवडणुकीत अमरिश पटेल यांचा मतदारसंघ असलेल्या शिरपूरमध्येच हिना गावित यांना सुमारे 45 हजार मतांची आघाडी मिळाली होती.
महायुतीत कुणाचा विरोध
हिना गावित यांना प्रामुख्यानं करणारे नेत्यांपैकी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी हे आहेत. नंदूरबार शहर हा त्यांचा मतदारसंघ असून, ते शिवसेनेचे माजी विधान परिषद आमदार आहेत. सध्या ते शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. त्यांचा गावितांच्या नावाला प्रामुख्यानं विरोध आहे. त्यांच्या मतदारसंघात २०१९ साली गावित यांना ४० हजारांची आघाडी मिळालेली होती. यासह जयकुमार रावल हेही हिना गावित यांच्या विरोधात असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र या दोन्ही नेत्यांनी उमेदवारीला विरोध केल्यानंतर, पक्षानं पर्यायी नाव सुचवण्यास सांगितलं होतं. मात्र गावितांइतका मोठा तगडा उमेदवार भाजपात नसल्यानं हिना गावित यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगण्यात येतंय.
पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांचे लहान बंधू राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले परंतु राजेंद्र गावित यांना कुठलेच इलेक्ट्रो मेरिट नाही. त्यामुळं हेही नाव मागे पडल्याचं सांगण्यात येतंय.
इच्छुकांपैकी दुसरे उमेदवार डॉक्टर सुहास नटावतकर यांची सुकन्या डॉक्टर समिधा नटावदकर या आहेत. गेल्या दहा वर्षात ही नेतेमंडळी कधीच जनतेत मिसळलेले नाहीत, त्यांचा जनसंपर्क सल्याचं सांगण्यात येतंय.
गावितांसाठी पोषक वातावरण
हिना गावित यांच्याविरोधात वातावरण निर्मितीचा प्रयत्नही झाला, मात्र गावितांना उमेदवारी नाकारली तर मतदारसंघ हातातून जाील अशी स्थिती आहे. त्यामुळेच प्रदेश भाजपाचा कुठलाच नेता ही रिस्क घ्यायला तयार नाही. लोकसभेत उत्कृष्ट काम, राज्याचा आणि केंद्राचा हजारो कोटी रुपयांचा निधी आणि त्या निधीचं वाटप, विकास कामांची रेलचेल ही हिना गावितांची जमेची बाजू असल्याचं सांगण्यात येतंय.
सध्या स्थितीत शहाद्याचे भाजपचे आमदार राजेश पाडवी शिरपूरचे भाजपचे आमदार अमरीश भाई पटेल यांना पक्षविरोधी कुठलीच कारवाई करता येणार नाही, असं केलं तर भविष्यातील त्यांची उमेदवारी धोक्यात येईल.