मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची दृष्टी असून मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून त्यांचेच हात बळकट करायचे असल्याचं मत माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले. देवरा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या वर्षा या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते.
आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा असून मी काँग्रेस सोडेन असे मला कधीही वाटले नव्हते. काँग्रेस पक्षाशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांचे नाते तोडून मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. माझं राजकारण हे सकारात्मक राजकारण असून मला लोकांची मदत करायची आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारख्या मेहनती नेत्याचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
माझी आई ही महाराष्ट्रीयन असल्याने स्वर्गीय बाळासाहेब माझ्या वडिलांना कायमच महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. राजकारणात लोकसेवा ही एकमेव विचारधारा आहे हे शिंदे साहेबांकडे बघून मला समजले. माझावर चुकीचा आरोप होण्यापूर्वीच शिंदेंनी आज मला पक्षात प्रवेश दिला, खासदार होऊन मी मुंबई व राज्याचे योग्य प्रतिनिधीत्व करू शकतो असे सांगत त्यांनी खासदारकीची इच्छाही व्यक्त केली. शिंदे गटाच्या वतीने दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.
२००४ मध्ये मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, तो काँग्रेस पक्ष आणि आजच्या काँग्रेसमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. काँग्रेस आणि उबाठा गटाने योग्य निर्णय घेतले असते, तर आज शिंदे साहेबांप्रमाणे माझ्यावर ही वेळच आली नसती अशी मनातील खंतही देवरा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या धोरणामुळे आज जगभरात भारत एका नव्या उंचीवर गेला आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशात अभूतपूर्व अशी प्रगती झाली आहे. मुंबईच्या बाबतीत सांगायचं तर, गेल्या दहा वर्षात शहरात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही आणि याचं श्रेय मोदी शहांच्या धोरणाला जातं असे मत त्यांनी व्यक्त केले. मोदींच्या हातात देश तर शिंदेंच्या हातात राज्य सुरक्षित आहे, त्यामुळे माझ्यासोबत आलेले आणि न आलेल्यांना आपण एकत्र येऊन शिवसेनेची ताकद वाढवू या असे आवाहन देवरा यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना मिलिंद यांचे पक्षात स्वागत केले. एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत तरूण पक्षात येत असल्याबद्दल त्यांचे स्वागत करत असल्याचे त्यांनी सांगितले. मिलिंद यांच्या मनात आज ज्या भावना आहेत त्याच दीड वर्षांपूर्वी माझ्या मनात होत्या कारण एवढी वर्षे एका पक्षाला दिल्यानंतर तो सोडून जाणे वाटते तेवढे सोपे नसते. मी देखील एवढा मोठा निर्णय घेताना माझ्या पत्नीला विश्वासात घेतले होते असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
तसेच, तुम्ही इतकी वर्षे काँग्रेससोबत काम केलंत. स्वर्गीय बाळासाहेब आणि मुरलीभाईंचा उल्लेख केलात. अशी माणसं पुन्हा होत नाहीत, ज्यांनी मला काय मिळालं त्यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो, याचा कायम विचार केला. तुम्ही म्हणालात की येत्या काही दिवसात काही प्रमुख नेत्याचाही प्रवेश होईल, हा तर फक्त ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे असे जाहीर केले.
सहसा मी कुणावर टीका करत नाही पण काहीवेळा प्रत्युत्तर द्यावे लागते. मात्र नुकतेच काही लोकं श्रीकांत शिंदेंच्या मतदार संघात जाऊन त्यांना साफ करा असे म्हणाले. पण लोकं बाहेर पडणाऱ्यांना साफ करत नाहीत, तर घरी बसणाऱ्यांना साफ करतात असा टोला शिंदे यांनी लगावला. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी एवढे लक्षात ठेवावे की तुम्ही जेवढे आमच्यावर बोलाल तेवढे जास्त खड्यात जाल असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
मुंबई शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. तर ‘डीप क्लीन ड्राईव्ह’च्या माध्यमातून संपूर्ण शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबई शहरात २०२ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू झाले असून त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना १४७ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या आणि उपचार मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला आहे.
मिलिंद देवरा यांच्यासोबत आज १० माजी नगरसेवक, २० माजी पदाधिकारी आणि ४५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यातील अनके जण हे लक्ष्मीपूत्र आहेत. त्यांच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मिलिंद देवरा या सगळ्यांच्या साथीने जे शक्य आहे ते नक्की करतील असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.