मुंबई : तलाठी परीक्षेत पेपर संदर्भात झालेला घोटाळा हा मध्यप्रदेशात एकेकाळी झालेल्या व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे असा खळबळजनक आरोप काँग्रेस ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी आज विधानसभेत केला. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना ते बोलत होते. तलाठी होऊ इच्छिणाऱ्या युवकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न पटोले यांनी केला.
सरकारच घोटाळा करते आणि सरकारच पुरावे मागते, हे आश्चर्यजनक आहे असेही नाना पटोले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रोहित पवार यांनी अर्थसंकल्पातील 51 टक्के खर्च झालेला नाही हा मुद्दा मांडला. योजनांचा लाभ लोकांना व्हायला हवा. दुसऱ्या राज्यातील एजन्सी आणू नका असे ते महानंद संदर्भात म्हणाले. परीक्षा फुटी संदर्भात केंद्र सरकारने कायदा केला तसा महाराष्ट्र सरकारने करावा अशी मागणी त्यांनी केली. जेथे दुष्काळ तिथे कॉलेज फी माफ करा. तलाठी परीक्षेसाठी भरलेले पैसे विद्यार्थ्यांना परत द्या अशा मागण्याही रोहित पवार यांनी यावेळी केल्या.