नवी दिल्ली
केंद्र सरकारने आणलेला प्रस्तावित नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक आणि टँकर चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाहन चालकांसाठीचा हा कायदा अत्यंत कठोर व जुलमी असल्याची भूमिका विरोधी पक्षाकडून व्यक्त केली जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.
वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा केंद्र सरकारने रद्द करावा. जनविरोधी काळे कायदे पारित करून जनतेस वेठीस धरण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस असे समाजातील सर्व घटक सातत्याने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे, अशा शब्दात वडेट्टीवारांनी आपला रोष व्यक्त केला.
या संपामुळे पुणे मार्केटयार्डमध्ये गाड्यांची आवक कमी झाली. बुलढाणा जिल्ह्यात एसटीला या संपाचा फटका बसू शकतो, असं चित्र आहे. विभागीय नियंत्रक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ तारखेपर्यंत संप असाच सुरू राहिला तर एसटी थांबवावी लागेल.
नव्या कायद्याला का होतोय विरोध?
नव्या प्रस्तावित मोटार वाहन कायद्यानुसार, अपघात झाल्याच्या स्थितीत ट्रक, टँकर चालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. याशिवाय अपघात झाल्यास वाहन चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच 7.5 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या तरतुदीला विरोध करीत ट्रक आणि टँकर चालकांनी संप पुकारला आहे.