मुंबई : राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना सांगली लोकसभा मतदारसंघातील जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चांगलीच ठिणगी पडली आहे . ठाकरे गटाने या मतदारसंघात निवडणुकीसाठी (Loksabha Election) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली आहे . त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे .हा वाद सुरु असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अचानकपणे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Narayan Jagtap )यांची भेट घेतली आहे . या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे .
सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना उबाठा गटासोबतच काँग्रेसही उत्सुक आहे.. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला विश्वासात न घेता चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली, असे काँग्रेसचे म्हणणे आहे तर शरद पवार (Sharad Pawar) यांनीही अशीच भूमिका घेतली आहे. आता ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाची चिन्हे दिसू लागली आहेत.अशातच संजय राऊत यांनी भाजप नेत्याच्या घेतलेल्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत .काँग्रेस आणि शिवसेना उध्दव ठाकरे गट यांचा सांगलीच्या जागेवरून तिढा सुटत नसताना आता संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत .त्यांनी लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग ही घेतला आहे . तर याआधी भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघातून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे . या उमेदवारीला भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी विरोध केला होता . आता त्यांचीच भेट संजय राऊत यांनी जत मधून घेतली आहे .
दरम्यान, काँग्रेस सांगलीच्या जागेवर अडून आहे. ही जागा काँग्रेसला न मिळाल्यास आम्ही चंद्रहार पाटलांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका सांगलीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली होती. म्हणजेच सांगली जागेचा तिढे थेट दिल्ली दरबारी गेला आहे. त्यामुळे आता या जागेवर नेमकं काय घडणार? ही जागा काँग्रेसला मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.