मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी सरकारवर (Narendra Modi sarkar )हल्लाबोल चढवला आहे . सध्याचा भाजप (bjp )पक्ष हा ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’ असा झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे . तसेच नरेंद्र मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते आहेत. आपण पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीची जागावाटपाबाबतची संयुक्त बैठक शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय ‘शिवालय’ येथे पार पडली. यामध्ये जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदींसह इतर घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला . ते म्हणाले , जेव्हा शिवसेना निर्माण झाली,तेव्हा ते मोदी हिमालयात असतील. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना खरी शिवसेना माहित आहे. त्यांनी त्यांच्याजवळ चायनीझ माल ठेवावा असा चिमटाही ठाकरे यांनी काढला. भाजप पक्ष खंडणीखोर झाला असून चंदा दो धंदा लो असे यांचे काम आहे. खंडणीखोर नेत्यांनी असे शिवसेनेला हिणवणे योग्य नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
भाजपवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, काल तीन गोष्टीचा एकत्रित योग होता. अमावस्या होती, ग्रहण होत आणि यांची सभा होती. काल जे भाषण झालं ते पंतप्रधान यांचे भाषण नव्हते. ते भेकडं जनता पक्षाचे नेते मोदी यांचे भाषण होते. भाजपमध्ये ताकद नाही म्हणून भेकडं म्हणत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलात शिवसेना ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे.सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला असून सांगली ठाकरे गट आणि भिवंडी राष्ट्रवादी शरद पवार गट लढवणार आहे.