मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघात (Jalna Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा 2009 प्रमाणेच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) विरुद्ध कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्यात सामना रंगणार आहे. महायुतिकडून या मतदारसंघात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) काँग्रेसकडून काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.त्यामुळे या तिसऱ्यांदा होणाऱ्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
2009 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. कल्याण काळे आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यात पहिल्यांदाच लढत झाली होती .तेव्हा रावसाहेब दानवे यांना 3 लाख 50 हजार 710 मते म्हणजेच 44 टक्के मतदान झाले होते. तर, दुसरीकडे कल्याण काळे यांना 3 लाख 42 हजार 228 मते म्हणजेच 42 .93 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे 8 हजार 482 मतांनी काळे यांचा पराभव झाला होता.त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसकडून कल्याण काळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. काळे हे दानवेंना कसे आव्हान देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विकासाच्या मुद्द्यांवर दानवे ही लोकसभा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे, तर काळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान रावसाहेब दानवे यांनी १९९९ पासून जालना लोकसभा मतदारसंघाचा ताबा घेतला आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्ञानदेव बांगर यांना पराभूत केले होते. त्यानंतर उत्तमसिंग पवार, कल्याण काळे, विलास औताडे यांनाही त्यांनी प्रत्येकी दोनदा पराभूत केले. १९९१ ची निवडणूक वगळता आठ वेळा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. १९८९ मध्ये पुंडलिक हरि दानवे, १९९६ व १९९८ च्या निवडणुकीमध्ये उत्तमसिंग पवार, यांच्यानंतर हा मतदारसंघ रावसाहेब दानवे यांनी आपल्याकडे खेचून आणला आहे.