Twitter : @NalavadeAnant
मुंबई
वन डे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) व भाजपा (BJP) हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यालाही मोदी स्वतःच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले आणि वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup) सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात मात्र पराभव झाला. भारतीय संघ जिंकला असता तर त्याचे श्रेय मात्र मोदी व भाजपाने घेतले असते. पण मोदी जेथे जातात तेथे पराभव होतो, त्यांना नशीब व प्रभू रामही (Prabhu Ram) साथ देत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
शासन आपल्या दारी ही ‘महानौटंकी’..
ते म्हणाले, भाजपाचे तिघाडी सरकार काँग्रेस सरकारच्याच योजना शासन आपल्या दारी म्हणून राबवत आहे. ही योजना म्हणजे महानौटंकी आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, एका कार्यक्रमाला तीन ते चार कोटी रुपये खर्च गेले जातात व ते पैसे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च केला जात आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे कंत्राट हे ठाण्यातील एका व्यक्तीला दिले आहे, जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी थांबवली पाहिजे.
व्यापाऱ्यांच्या हितासाठी खरेदी केंद्रे सुरु करण्यास टाळाटाळ
राज्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे, शेतकऱ्यांना सरकारची मदत अद्याप मिळालेली नाही, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली त्याला भाजपा सरकारच जबाबदार आहे. त्यांना मदत करण्याऐवजी सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे, अंमलबजावणी मात्र काही होत नाही. खरेदी केंद्रे सुरु करण्याची घोषणा केली पण तीही अजून कागदावरच आहे. मुठभर व्यापाऱ्यांच्या हितासाठी सरकार खरेदी केंद्रे सुरु करण्यास टाळाटाळ करत असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.