Twitter : @NalavadeAnant
मुंबई
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे. पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे, हा फोटो खरा आहे का? बावनकुळे जुगार खेळत होते का? आणि जुगार खेळण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कोठून? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
उद्धव सेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सकाळीच बावनकुळे यांचे कसिनोमधील फोटो समाज माध्यमावर टाकून बावनकुळे यांनी कसिनो मध्ये साडेतीन कोटी रुपये उधळले, असा आरोप केला होता. या आरोपाचे भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) तसेच चित्रा वाघ यांनी खंडन केले. राऊत यांची ही विकृत मानसिकता आहे, राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राऊत यांच्यावर केली आहे.
संजय राऊत, नाना पटोले हे वैफल्यग्रस्त झाले असून सकाळी उठल्यावर काहीतरी निराधार शोधायचे आणि पब्लिसिटीत राहायचे अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न दिसतोय, अशी टीका दरेकर यांनी केली आहे. तर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी नाना पटोले यांच्या संदर्भातील मेघालयातील एक संशयास्पद फोटो समाज मध्यामावर पुन्हा एकदा पोस्ट केला आहे.