महाड : महाड तालुक्यातील खाडेपट्टा विभागातील नागेश्वरी नदीवर वामने येथे पूल बांधण्याची जोरदार मागणी होत आहे. हा पूल झाल्यास सुमारे 18 गावांतील नागरिकांचा प्रवास सुखकर होईल. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रिहान देशमुख यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे महाड येथील नियोजित दौऱ्यात निवेदन सादर केले.
महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील अप्पर तुढील, कुंबळे, लोअर तुढील, खुटील, आडे, जुई, खैरे, वलंग, ओवळे, चिंबावे, तेलंगे, वराठी, गोमेंढी आदी गावांतील नागरिक वारंवार वामने रेल्वे स्थानकावरून मुंबई व रत्नागिरीला प्रवास करतात. मात्र, नदीवर पूल नसल्यामुळे त्यांना मोठ्या अंतराने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्ची पडतो.
सध्या नागरिकांना रिक्षाने 10-12 किमी प्रवासासाठी 300 ते 400 रुपये भाडे द्यावे लागते, तर मुंबईला जाण्यासाठी रेल्वे तिकीट फक्त 50 रुपये आहे. ही असमान खर्च तफावत लक्षात घेता, पूल झाल्यास नागरिकांचा वाहतुकीवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.
नागेश्वरी नदीवर पूल झाल्यास बंधारा बांधता येईल, ज्यामुळे भरतीच्या वेळी एमआयडीसीचे दूषित सांडपाणी नदीत येणे थांबेल. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासह स्थानिकांचा आरोग्यविषयक प्रश्नही सुटू शकतो.
या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रेहान देशमुख, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस बिपिन मामुनकर, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयवंत दळवी, महेश सावंत यांनी महाड दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन दिले.
गावकऱ्यांच्या सततच्या मागणीनंतर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा आणि पूल बांधणीला गती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.