महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन पक्ष फोडूनही भाजप पिछाडीवर!

X: @vivekbhavsar

मुंबई: आजपासून 12हा 13 वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2012 च्या आसपास नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय स्तरावर उदय झालेला होता. समाज माध्यमांचा अत्यंत योग्य पद्धतीने वापर करून नरेंद्र मोदी यांनी स्वतःची विकास पुरुष आणि गुजरातचे विकास मॉडेल हे देशभर लोकांच्या मनात रुजवले होते. मोदींबद्दल एक अपेक्षा आणि आशा निर्माण झाली होती. त्यातूनच पुढे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा देश पातळीवर सर्वाधिक जागा घेणारा पक्ष म्हणून निवडून आला आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत आले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही त्याचा फायदा झाला आणि मोदी लाटेत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना असे सरकार सत्तेमध्ये आले. 2019 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात सत्ता वाटपाच्या मुद्द्यावरून बिनसले आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात धरून सत्ता मिळवली. त्याचाच राग धरून देवेंद्र फडणवीस यांनी आधी शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा गट उद्धव ठाकरे यांच्याकडून पळवला आणि एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून स्वतः उपमुख्यमंत्री झाले. पुढे त्यांनी राष्ट्रवादीतही फूट पाडून अजित पवार यांना सोबत घेऊन त्यांनाही सत्तेत सहभागी करून घेतले.

महाराष्ट्रातील मागच्या पाच वर्षांचा राजकीय इतिहास बघता भाजपने दोन पक्ष फोडले आणि सत्ता मिळवली. मात्र एवढे करूनही भाजपच्या हाती काय लागले? याचा जर लेखाजोखा मांडला तर लक्षात येते की भाजपची राजकीय अधोगतीच, नुकसानच झाले आहे. भाजप पिछाडीवर गेला आहे, हे मी सांगत नाही तर हे आकडे सांगतात.

सन २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपचे 123 आमदार निवडून आले होते. याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची युती होती आणि युती म्हणून ते निवडणूक लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी शेवटच्या क्षणी भाजपने शिवसेनेबरोबरची युती तोडली आणि दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. तरीही शिवसेनेने 63 जागी विजय मिळवला होता. सुरुवातीला शिवसेना विरोधी पक्षात बसली, नंतर नागपूर अधिवेशन संपताच शिवसेना पक्ष भाजप सोबत सत्तेत सहभागी झाला आणि पुढे पाच वर्षे या युतीचा संसार रडत- खडत का असेना पण सुरू होता.

2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्या. विधानसभा निवडणूक एकत्र लढूनही भाजपचे संख्याबळ 123 वरून 105 असे घटले. याचा अर्थ भाजपच्या 18 जागा कमी झाल्या. ही निवडणूक देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली होती.
अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते आणि ते पाळले नाही, असे कारण देत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत घरोबा करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.

आपले 105 आमदार निवडून येऊनही आपल्याला सत्तेत सहभागी होत आले नाही याची सल भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असावी. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असा चंगच फडणवीस यांनी बांधला असावा. त्यातूनच पुढे त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – भाजपा असे युतीचे सरकार स्थापन केले. अर्थात असे करताना भाजपाला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री हे बिगर घटनात्मक पद स्वीकारावे लागले. उपमुख्यमंत्री या पदाला तसं कुठलेही वैधानिक अधिकार नाहीत. मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी त्यांची पॉवर या अडीच वर्षात दाखवून दिली आणि त्याचा भाजपलाही मोठा फटका सहन करावा लागला.

देवेंद्र फडणवीस केवळ शिवसेना फोडून थांबले नाहीत तर त्यांनी पुढे राष्ट्रवादी पक्षही फोडला आणि अजित पवारांना सोबत घेऊन त्यांनाही सत्तेत सहभागी करून घेतले. खरंतर आता राज्यामध्ये महायुती म्हणजे शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे सरकार सत्तेत आले होते. हे तिघेही नेते दिग्गज आहेत, कामाप्रती त्यांची निष्ठा आहे आणि अत्यंत कामसू आहेत. असे असूनही या महायुतीला सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.

केंद्रात मोदींचे सरकार सत्तेत आले होते, मात्र त्यांनाही बहुमत मिळाले नव्हते, त्यांनाही कुबड्या घ्यावा लागल्या. मतदारांनी भाजपला दिलेला हा मोठा झटका होता. ज्या भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 23 जागा मिळाल्या होत्या, त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या नऊ जागा मिळाल्या. भाजपसाठी हा अत्यंत लाजिरवाणा पराभव होता. दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेने ७ तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नऊ जागा मिळवल्या, याचा अर्थ दोन्ही शिवसेना मिळून त्यांना 16 जागी विजय प्राप्त झाला. शिवसेना एकत्र असताना त्यांनी 2019 च्या निवडणुकीत 18 जागा जिंकल्या होत्या. याचा अर्थ शिवसेना पक्ष फोडूनही त्यांचे फार मोठं नुकसान झाले नाही.

शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढूनही त्यांचा फायदा झाला, ज्या पक्षाच्या चार जागा निवडून येणं अशक्य होतं, त्यांनी दोन अंकी आकडा गाठला.

आता उद्याच्या निवडणुकीचा विचार करू. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 54 जागा मिळाल्या होत्या. आताचा अंदाज असा आहे, की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किमान 50 जागा तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किमान 25 ते 30 जागा जिंकेल. याचाच अर्थ दोन्ही राष्ट्रवादी मिळून किमान 80 जागा मिळवण्याची शक्यता आहे. हा अंदाज आपण दहा – वीस जागेने कमी केला तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडूनही या पक्षाचा तसा फायदाच होताना दिसतो आहे.

ज्या काँग्रेसला 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 42 जागा मिळाल्या होत्या, तीच काँग्रेस आज किमान 70 जागा मिळवेल अशी शक्यता आहे. याही जागा आपण 10 ने किंवा 20 ने कमी केल्या तरीही काँग्रेसचे संख्याबळ वाढणारच आहे, हे यातून स्पष्ट दिसते आहे. हेच गणित शिवसेनेला देखील लागू होते. शिंदे यांची शिवसेना 35 ते 40 जागा तर उद्धव यांची शिवसेना 25 ते ३० जागा काढेल. याचाच अर्थ फुटी नंतर देखील शिवसेना तशी फायद्यातच राहणार आहे.

आता भाजपचा विचार करूया. भाजपला 60 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही असा अंदाज गेले महिनाभर वर्तवला जात आहे. भाजप आणि संघाचे नेते म्हणतात की, आमच्या पक्षाची स्थिती सुधारली आहे आणि आम्ही जास्त जागा जिंकू. जास्त म्हणजे किती? 80, 90? एवढ्या जागा भाजप जिंकेल असं गृहीत धरलं तरीही भाजप 105 चा आकडा गाठू शकणार नाही, 123 चा आकडा गाठणे तर आता अजिबात शक्य नाही. म्हणजेच गेल्या दोन निवडणुकात आणि आत्ताची निवडणूक या तिसऱ्या निवडणुकीमध्ये भाजपचे संख्याबळ 123 वरून 105 आणि 105 वरून 90 असेच घटणार आहे, हे जवळपास निश्चित आहे.

मग दोन पक्ष फोडून भाजपला काय मिळाले? या भाजपची जेवढी जास्त प्रतिमा मलिन झाली, त्याही पेक्षा जास्त राग लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्त केला.. पक्ष फोडण्यासाठी फडणवीस यांना दोषी धरले गेले आणि पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना ती जबाबदारी स्वीकारणे भाग आहे.

पक्ष फोडून राज्य आणि सत्ता हस्तगत करता येते, मात्र हे फार काळ चालत नाही आणि इथल्या सजग मतदाराला ही बाब मान्य नाही, हे यातून अधोरेखित होत आहे असे मला वाटते. भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी यातून बोध घ्यावा आणि यापुढे पक्ष फोडाफोडीचे राजकारण न करता जर संख्याबळ कमी असेल तर विरोधी पक्षात बसण्याचा शहाणपणा दाखवावा आणि सत्तेतील पक्षांचे गैरप्रकार उघडकीस आणून त्यांना मतदारांच्या नजरेतून उतरवावे. हेच यापुढे घडेल अशी अपेक्षा करूया!

महायुती आणि महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा!

(लेखक विवेक भावसार हे राजकारण आणि TheNews21 या पोर्टलचे संपादक आहेत. त्यांना 9930403073 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात