X : @therajkaran
मुंबई : दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा (development plan of Dikshabhoomi) तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे (Underground parking) काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र, लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fandavis) यांनी विधानसभेत दिली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (VBA leader Prakash Ambedkar) यांनी या भूमिगत पार्किंग ला विरोध केला होता. विधिमंडळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.
दीक्षाभूमी, नागपूर येथे कुठलीही पार्किंगची मागणी नसतांना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला. याविरोधात जनता उतरली आहे. ट्रस्टीनी लोकांच्या भावनेशी खेळू नये. आमचाही या पार्किंगला विरोध आहे. आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) उभी आहे, असे ट्वीट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
लोक भावनेचा आदर करून हे काम तात्काळ थांबवावे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून गृहमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांशी चर्चा करावी, अशी भूमीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी मांडली.
लोकांचा विरोध असताना, दीक्षा भूमी येथील स्तूप आणि मूळ ढाचाला धोका होण्याची भीती असताना भूमीगत पार्कींगचा अट्टाहास कशासाठी, या कामातून कोणाचा फायदा होणार आहे, असे सवाल करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने जर वेळीच या प्रकरणाची दखल घेतली असती तर आंदोलन तीव्र झाले नसते. परंतु सरकार संवेदनशील नाही जनतेच्या भावनांचा आदर करत नाही. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ येते,अशा शब्दात वेडेट्टीवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले.