ताज्या बातम्या महाराष्ट्र

निधी वाटपात युपी, बिहारला भरभरून दान; महाराष्ट्राच्या तोंडाला मोदींनी पुसली पाने

X : @NalawadeAnant

मुंबई

महाराष्ट्रातून जीएसटीसह (GST) सर्व प्रकारच्या कर संकलनातून (Tax collection) सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो. पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार (NDA government) स्थापन झाल्यानंतर राज्यांना निधी वितरण करण्यात आले. यामध्ये भाजपाशासित राज्यांना भरभरून निधी आणि महाराष्ट्राला केवळ ८ हजार कोटी रुपये देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी बुधवारी येथे केला.

पटोले म्हणाले की, उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) सर्वात जास्त २५ हजार कोटी रुपये, मध्य प्रदेशला (Madhya Pradesh) १० हजार ९७० कोटी, तर सरकारला पाठिंबा देणाऱ्या नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या बिहारला (Bihar) १४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर राज्यासाठी निधी मागण्याची हिम्मत नसल्यानेच आज राज्यावर ही परिस्थिती आल्याचाही आरोप पटोले यांनी केला.

केंद्रातील भाजपाचे सरकार (BJP government) सातत्याने महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक देत तर आहेच, विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांनाही कमी निधी देण्यात आला असे सांगत, यात कर्नाटकात (Karnataka) काँग्रेसचे सरकार आहे त्यांना ५ हजार कोटी रुपये, पंजाबच्या आम आदमी (Aam Aadmi Party) पक्षाचे सरकारला २५२५ कोटी रुपये, मात्र आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या पक्षाने केंद्र सरकारला पाठिंबा दिल्याने त्यांना मात्र ५६२२ कोटी रुपयांचा भरघोस निधी देण्यात आला आहे. हा पैसा सामान्य करदात्याचा असून त्यांच्यासाठीच तो वापरला जातो. पण भाजपा सरकार जाणिवपूर्वक निधी वाटपात भेदभाव करून जनतेवर अन्याय करत असल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी केला.

राज्यात भाजपाप्रणित सरकार असतानाही केंद्राकडून जास्त निधी आणण्यात त्यांना यश आले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना दिल्लीतून जे मिळेल त्यातच ते समाधान मानतात हे राज्याचे दुर्दैव आहे. कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही केंद्रातील भाजपा सरकार जाणीवपूर्वक निधी वितरणात भेदभाव करत होते. महाराष्ट्रावर केंद्रातील भाजपा सरकार करत असलेल्या अन्यायाची नोंद महाराष्ट्रातील जनता घेईल व लोकसभा निवडणुकीत ज्यापद्धतीने त्यांना जागा दाखवली तशीच विधानसभा निवडणुकीतही दाखवतील, असा सज्जड इशाराही पटोले यांनी दिला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात