मुंबई- माढा लोकसभा मतादरसंघावरुन राज घराण्यातील संघर्ष उफाळून आलेला दिसतो आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाच्या पहिल्या यादीत रणजीतसिंहं नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्या उमेदवारीला अजित पवार राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी आधीच विरोध केला होता. त्यांना यात मोहिते पाटील यांची साथ मिळालीय. शेकापचे जंयत पाटील यांच्या उपरस्थितीत काही दिवसांपूर्वी याबाबत बैठक पार पडली होती. त्यानंतर मंगळवारी या वादाचे पडसाद मुंबईत पाहायला मिळाले.
बैठकांचं सत्र तोडगा मात्र नाहीच
मंगळवारी रामराजे नाईक निंबाळकर हे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थआनी दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू संजीवराजेही होते. संजीवराजेंना अजित पवार राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळावी, अशी रामराजेंची मागणी होती. या दोन्ही नेत्यांसोबोत फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर रामराजे आणि अ्जित पवार निघून गेले. रामराजेंना सोडण्यासाठी रणजीतसिंह बाहेर आल्यानं, वादावर पडदा पडल्याचं मानण्यात येत होतं.
या बैकीनंतर फडणवीसांच्या सागर निवासस्थानी रणजीतसिंह, उत्तमराव जानकर, जयकुमार गोरे, श्रीकांत भारतीय आणि फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर सगळं काही ठिक आहे अशी प्रतिक्रिया भारतीय यांनी दिली होती.
मात्र त्यानंतर रात्री उशिरा अद्याप वाद संपलेला नाही, असं रामराजे यांच्याकडून सांगण्यात आलंय. त्यामुळं या मतदारसंघात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
मविआतून लढण्यासाठी धैर्यशील मोहिते इच्छुक, प्रचारालाही सुरुवात
रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील हे एकत्र आल्याचं दिसतंय. अकलूजच्या शिवरत्न या बंगल्यावर रविवारी रामाराजे निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, जयंतराव जगताप, सांगोल्याचे डॉ. अनिकेत देशमुख यांच्यात डीनर डिप्लोमसी पार पडली. यावेळी मोहिते पाटील यांच्या शक्ति प्रदर्शनाची राज्यभरात चर्चा झाली. या ठिकाणी पोहचलेल्या गिरीश महाजन यांनाही काही काळ वेटिंगवर काढावा लागला. मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी महाजनांसमोर निंबाळकरांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
सोमवारी धैर्यशील मोहितेंच्या प्रचाराला सुरुवात
सोमवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं. करमाळ्यातून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. दुसरीकडे शरद पवार आज माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत उमेदवारी ठरवणार आहेत. यात धैर्यशील पाटील आणि महादेव जानकर पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. जानकर मविआत आले तर माढाची जागा त्यांना सोडण्याची तयारी शरद पवारांनी दाखवलेली आहे. त्यात आता धैर्यशील पाटील मैदानात उतरल्यानं काय निर्णय होणार हे पहावं लागणार आहे.
रामराजे आणि विजयसिंह मोहिते पाटलांची नाराजी भाजपाला भोवणार?
माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील घराण्याला भाजपाकडून तर रामराजे निंबाळकरांना अजित पवार राष्ट्रवादीतून लोकसभेचं तिकिट हवं होतं. मात्र भाजपानं पुन्हा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना संधी दिल्यानं या दिग्गजांच्या नाराजीचा फटका भाजपाला मतदारसंघात बसण्याची शक्यता आहे. अशात शरद पवार यांनी घैर्यशील मोहितेंना उमेदवारी दिली तर हा संघर्ष आणखीन तापण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
हेही वाचाःभाजप स्थापना दिनानिमित्ताने मुंबईत 400 कार्यक्रमांचं आयोजन