Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्यात आम्ही फक्त दोन ठिकाणी उत्तर सभा घेतल्या. आता पक्ष वाढीसाठी राज्यभरात दौरे करणार आहोत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (NCP State President Sunil Tatkare) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली. तटकरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरनामुळे आता शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटाची (Ajit Pawar faction of NCP) सभा यापुढे होणार नाही, असे संकेत त्यामुळे मिळाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून शरद पवार महाराष्ट्रभर दौरे करत असून ते जाहीर सभा घेऊन जनतेशी संवादही साधत आहेत. या जाहीर सभांना उत्तर देण्याकरता अजित पवार गटाकडूनही उत्तरदायी सभा घेण्यात येत आहेत. परंतु, शरद पवार आता जिथे सभा घेतील, तिथे उत्तरसभा न घेण्याचा निर्णय अजित पवार गटाने घेतल्याचे समजते. पक्षफुटी संदर्भात निवडणूक आयोगात सुरू सुनावणी सुरू असून अजित पवार गटाला निवडणूक आयोगाकडून फटकारले जात असल्याने या उत्तरसभा न घेण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले.
आम्ही दोनच उत्तरसभा म्हणून घेतल्या. बीड (Beed) आणि कोल्हापूर (Kolhapur) येथे या उत्तरसभा झाल्या. येवल्याला आमची सभा झाली नाही. परवा कळबंटला पक्षसंघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने गेलो होतो. पुण्याला (Pune) सभा घेण्याचा आमचा काही मानस नाही. रविवारी पुणेकर अजित पवारांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने आले होते. हे भाग्य अजित पवारांचेच असेल, कारण पुणेकरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. यापुढे पक्ष वाढीसाठी राज्यभरात नेते दौरे करणार आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
निवडणूक आयोगातील (Election Commission) सुनावणी आणि उत्तरसभांचा दुरान्वयेही संबंध नाही. पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी अजित पवार राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. या दौऱ्याच्या नियोजनाची तयारी सुरू आहे. दसरा झाला की राज्यात झंझावाती दौरे सुरू करणार आहोत, अशी माहितीही तटकरे यांनी दिली.