राज्यातल्या आयुष्यमान भारत मिशनच्या प्रमुख पदाची सूत्रे
Twitter : @therajkaran
मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू डॉ. ओमप्रकाश शेटे (Dr Omprakash Shete) यांना केंद्रातून परत महाराष्ट्रात पाचारण केले आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेद्वारे (Ayushman Bharat Mission) राज्यात ‘आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र’ हे अभियान नवनिर्मित करून त्याच्या कक्षप्रमुख पदाची धुरा डॉ. शेटे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून केलेल्या अनुभवाची व पुण्याईची शिदोरी गाठीशी असलेल्या ओमप्रकाश शेटे यांच्याकडून सर्वसामान्य व गरजवंत रुग्णांच्या खुप मोठ्या अपेक्षा आहेत.
भाजपा सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारची सामाजिक प्रतिमा घराघरात पोहोचवण्याचे काम या कक्षाने केले होते. केवळ साडेचार वर्षात दिवसरात्र काम करत डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात जास्त निधी सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी पोहोचवण्याचे काम केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रुग्णसेवेचा’ संदेश घेऊन राज्यभर आरोग्य शिबीरे (health camp) भरवली होती. अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात सरकारची रुग्णसेवा पोहोच केली होती.
तत्कालीन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख राहिलेले डॉ. ओमप्रकाश शेटे हे सध्या केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयामध्ये सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात (CM Medical Relief Cell) असताना धर्मादाय व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता व धर्मादाय आणि महात्मा फुले योजनेतील लाभार्थ्यांना करोडो रुपयांचा लाभ झालेला आहे. डॉ.ओमप्रकाश शेटे यांना राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये सुसूत्रता व सुधारणा करण्यासाठी या नवीन अभियानाची धुरा देण्यात आल्याचे समजते.
डॉ. शेटे यांनी 2014 ते 2019 या कार्यकाळात अतिशय भरीव कामगिरी केली होती. त्यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ‘पैश्याअभावी किंवा उपचाराअभावी सामान्य माणसाचा जीव जाता कामा नये’ हा देवेंद्र फडणवीस यांचा संदेश राज्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत नेला. डॉ. शेटे यांची खासियत म्हणजे सर्वपक्षीय संबंध, कोणताही पक्षीय भेदाभेद न करता, कुठलीही शिफारस न घेता प्रामाणिकपणे काम करणे. सर्वसामान्य रुग्णांना जात, धर्म, पंथ विरहित न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाला. त्यामुळेच त्यांची राज्यभरात ‘देवदूत’ म्हणून ओळख आहे.
डॉ. शेटे हे मागील दोन वर्षापासून केंद्रातील आरोग्य मंत्रालयामध्ये आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्याकडे सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. अतिशय धडाडीचे, समय सूचक, धाडसी आणि संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे.
सामान्य रुग्णांना तात्काळ व सुलभ पद्धतीने उपचार मिळावे यासाठी नवीन व्यासपीठ निर्माण करण्याचा बहुधा हा देशातील पहिला प्रयोग असावा. “आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र” या अभिनव उपक्रमाद्वारे नवीन समिती गठीत करुन या समितीच्या कक्ष प्रमुख पदी डॉ. ओमप्रकाश शेटे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये आरोग्य विभागाच्या आयुक्तांपासून ते कामगार व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करत हा लोकोपयोगी शासन निर्णय आजच निर्गमित करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेमधील त्रुटी दुरुस्त करत सामान्य लोकांना उपचारासाठी जास्तीत जास्त लाभ देण्याचं मोठं आव्हान या समिती समोर आहे. डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.