ताज्या बातम्या महाराष्ट्र

माझ्या घरावर समाजकंटकांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित : आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. तसा मीसुध्दा या आंदोलनात मागील दोन महिन्यापासून सहभागी आहे, असे सांगतानाच समाजकंटकांनी आपल्या घरावर कशा पद्धतीने हल्ला केला याची आपबीती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी गुरुवारी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितली. 

दरम्यान, या हल्ल्यासाठी आलेल्या जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त (Maratha community) इतर जातीचे लोक सहभागी होते. याशिवाय अवैध धंदे करणारे लोकंदेखील होते आणि राजकीय विरोधकही होते, असा आरोपही आ. सोळंके यांनी केला. 

या जमावात काही शिक्षकही होते. शिवाय जो ३०० जणांचा जमाव आला होता, त्यांच्याकडे शस्त्रही होती. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूनेच आले होते, असा दावाही आ. सोळंके यांनी केला.

गेल्या दोन महिन्यापासुन मराठा आरक्षण (Maratha reservation) विषय सुरू आहे. राज्यभरात आंदोलने सुरु आहेत. देशात आणि राज्यात आंदोलन होत आहेत. बीड जिल्ह्यात वातावरण गंभीर आहे. २०११ पासून मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange Patil) आरक्षण विषयावर काम करत आहेत. संपुर्ण मराठा समाज त्यांच्या नेतृत्वात एकवटला असून एक अतिशय प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण व्यक्ती म्हणून ते पुढे येत आहे असेही आ. सोळंके यांनी स्पष्ट केले. 

माजलगाव मतदारसंघाचा आमदार होण्यापूर्वी पंचायत समिती सभापती, जिल्हापरिषद सदस्यदेखील होतो. माझे वडील जिल्हा परीषद अध्यक्ष होते. १९६७  ते १९८० ते राज्यमंत्री, मंत्री देखील होते. मी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. १९८७ ते २०२३ असा ३६ वर्षाचा अनुभवही आ. सोळंके यांनी बोलून दाखवला. 

आमदार प्रकाश सोळंके यांची आपबीती

ज्यावेळी ३० ऑक्टोबरला घटना घडली, त्यावेळी आपण घरातच होतो. माजलगाव बंद करण्यात आले होते. त्यावेळी ५ हजार तरुण आले होते. साडे दहा वाजता काही तरुण आले आणि त्यांनी मला हा सर्व जमाव माझ्या घरावर येणार आहे, अशी माहिती दिली. मी तरी देखील तिथेच थांबलो. मी त्यांच्याशी चर्चा करावी यासाठी थांबलो होतो. मात्र माझ्या घरावर जोरदार दगडफेक करण्यात आली. जो जमाव आला त्यात अवैध धंदे करणारे आणि राजकीय विरोधक लोकच जास्त होते, असा स्वानुभवही आ. सोळंके यांनी बोलून दाखवला. 

यासंदर्भात पोलिसांना सीसीटिव्ही फुटेज दिले आहेत. केवळ दोषींवर कारवाई करा. सरसकट कारवाई करु नका, अशी मागणी पोलिसांकडे केली असल्याचेही आ. सोळंके यांनी स्पष्ट केले.

या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतही चर्चा केली असून हे बीड पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. घटना घडल्या त्यावेळी पोलिसांनीही केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. मला असे वाटतेय की पोलिसांचे मनोधैर्य जालना घटनेनंतर कमी झाले आहे. ते वाढवणे गरजेचे असल्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

माझ्या घरावर हल्ला करणाऱ्यांमध्ये आतापर्यंत २१ लोकांना अटक झाली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर ही अटक असून त्यामध्ये मराठा समाज वगळता इतर ८ आरोपी आहेत, अशी माहितीही आ. सोळंके यांनी दिली. या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सरचिटणीस लतिफ तांबोळी उपस्थित होते.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात