महाराष्ट्र ताज्या बातम्या

आचारसंहितेच्या भीतीने मंत्रालयात उसळला जनतेच्या रांगांचा महासागर!

X: @therajkaran

मुंबई: अ.. ब….ब…. येवू घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता कदाचित याच आठवड्यात कधीही लागू शकते ही शक्यता गृहीत धरून मंत्रालयात सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य जनतेच्या रांगेचा विक्रमी महासागर उसळल्याचे अभूतपूर्व चित्र कधी नव्हे ते पाहण्यास मिळाले. आचारसंहिता लागू होण्याआधी आपली कामे वेळेत मार्गी लागावीत यासाठी रांगेतला जो तो आपल्या जीवाचे रान करतानाचे दृश्य सर्वच प्रवेशद्वारावर दिसून आले. मात्र कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घेत मंत्रालयीन सुरक्षा विभागातील अपुऱ्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने ज्या संवेदनशीलतेने हाताळले ते ही वाखाणण्याजोगेच होते.

सोमवार हा तसा आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने आपल्या कामानिमित्त मंत्रालयात अभ्यागतांची येणारी गर्दी तशी सर्वसामान्याच असते, असा आजवरचा अनुभव आहे. त्यातही या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठका या अगदी अपवादात्मक घेतल्या जातात. या बैठकीचे नेहमीच एक कुतुहल असे आहे की, जर का अशी बैठक असेल तर त्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम हा मुख्य सचिवांच्या कार्यालयाकडून संबंधित मंत्री कार्यालय व विभागांच्या सचिव व अन्य अधिकाऱ्यांना लेखी दिला जातो. मात्र याचा सुगावा हा जनतेपर्यंत कसा पोहचतो हे एक न उलगडणारे कोडेच आहे.

असो, आज सकाळपासूनच आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर मंत्रालयाच्या जेथून एक दिवसाचे प्रवेश पास देण्यांत येतात त्या खिडक्यांवर अभ्यागतकांची तोबा गर्दी उसळली. त्याला कसे आवरावे या विचाराने मंत्रालयीन सुरक्षा यंत्रणेपुढेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी डोक्यावर बर्फ ठेवून परिस्थिती हाताळावी असे वरिष्ठांचे आदेश सुटले. आजच्या अपवादात्मक परिस्थितीसाठी काही नियम वरिष्ठांनी सामंजस्याने सैल केले. त्याचीच परिणती म्हणून ज्या ज्या मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अभ्यागतांना सोडण्यासाठी शिफारस पत्रे पाठवली, अशा तब्बल २००० ते २५०० हजार व्हींआयपी अभ्यागत त्यात दलाल, कंत्राटदार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नेत्यांना दुपारी १२ ते दीड या काळात मंत्रालयात प्रवेश देण्यांत आला. तर दुपारी २ नंतर ज्याच्याकडे प्रवेश पास आहेत त्यांची अधिक चौकशी न करता त्यांना प्रवेश देण्यांत आला. अशांची संख्या नेहमी पेक्षा जास्त म्हणजे संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत जवळपास ५ ते ७ हजाराच्या आसपास होती. म्हणजेच आजच्या एकाच दिवशी एकीकडे मंत्रिमंडळ बैठक सह्याद्री अतिथीगृहात सुरू असताना ते त्यानंतर मिळून जवळपास १० हजाराच्या जवळपास अभ्यागत, विविध पक्षांचे पदाधिकारी, नेते, प्रमूख कार्यकर्ते, नेहमीचे कंत्राटदार, एजेंट, व अन्य लोकांना आपल्या कामानिमत्त प्रवेश देण्यात आल्याची माहिती मंत्रालयीन सुरक्षा विभागातील विश्वसनीय सूत्रांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

आता जी धास्ती या अभ्यांगतांना तीच सत्ताधारी राज्यकर्त्यांनाही असल्याचा प्रत्ययही आज अनुभवण्यास आला. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत बहुतांश जनतेवर थेट प्रभाव पाडणारे निर्णय घेण्यात आले. त्यात बीडीडी चाळ धारकांना मुद्रांक शुल्कात विक्रमी कपात असो, की गिरणी कामगारांच्या वारसांना प्राधान्याने घरे देण्याचा विषय असो, असे काही जनतेला आकर्षित करणारे पण लोकोपयोगी असे तब्बल ३३ निर्णय घेण्यात आले. आता लोकसभा आचारसंहिता लक्षांत घेता आणखी जे लोकोपयोगी प्रस्ताव वर्षानुवर्ष धूळ खात पडून आहेत त्यांनाही नव्याने पुढच्या बहुदा बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आणण्याचे फर्मान मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुख्य सचिवांना देण्यांत आल्याची विश्वसनीय माहिती नुकतीच हाती आली आहे.

या निर्णयामध्ये वांद्रे येथील शासकीय कर्मचारी जे निवृत्त होऊनही अनेक वर्ष शासकीय निवासस्थान अडवून बसले आहेत, अशांना काहीतरी माफक किंमत आकारात ते त्यांच्या नावावर करुन देत यापुढे कोणत्याही कर्मचारी व अधिकारी यांना शासकीय निवासस्थान देताना त्यांना त्या निवासस्थानी अधिकार सांगता येणारं नाही, असे सक्तीचे बंधपत्र घेत नावावर करुन देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पदोन्नती व अन्य मागण्यांवर निर्णय घेतला जाणार असल्याची खात्रीलायक माहितीही याचं विश्वसनीय सूत्रांकडून देण्यांत आली.

मुख्यमंत्री कार्यालय तसेच मंत्री कार्यालयातही वर्दळ वाढली….

आपापली कामे आचारसंहितेत अडकून बसू नयेत आणि त्याचा फटका बसू नये या उद्देशाने मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय तसेच मंत्री कार्यालयात वर्दळ वाढल्याचे चित्र आज मोठ्या प्रमाणात मंत्रालयात दिसून आले. नेहमीपेक्षा मंत्रालयातील अभ्यागतांची संख्या दोन ते तीन पट अधिक वाढल्याचे दिसून आली. आमदारांचे विकास निधीची कामे वेळेत पास करून घेण्यासाठी मंत्री कार्यालयात आमदारांच्या पीए आणि पी एस ची धावपळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे देखील आज दिसून आले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात