मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला आहे . अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागून असलेल्या राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha)मतदारसंघात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj )विरुद्ध संजय मंडलिक (Sanjay Mandlik)अशी लढत रंगणार आहे महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे तर दुसरीकडे महायुतीच्या संजय मंडलिक यांचा प्रचारही जोरदारपणे केला जात आहे. अशातच आता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif )यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . या निवडणुकीत कागल मधील महायुतीचे तीन गट एकत्र येऊन मताधिक्य मिळवले, तर साक्षात परमेश्वर आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .
कोल्हापूर जिल्ह्यात कागलमध्ये सर्वाधिक गटातटाचे राजकारण केले जाते. तेथे घाटगे-मुश्रीफ-मंडलिक असे मातब्बर गट समजले जातात.या पार्श्वभूमीवर बोलताना मुश्रीफ यांनी सांगितले की, आपल्या तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा गट एकत्र येऊन अधिक मताधिक्य मिळवलं तर या निवडणुकीत साक्षात परमेश्वर आला तरी पराभव मंडलिक यांचा पराभव होणार नाही. महायुतीमधील तीन गट एकत्र आल्यास संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही असे ते म्हणाले .यासाठी हेलिकॉप्टरने मतदारांना आणायला लागले तरी चालेल, पण मागे पडायचं नाही असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं आहे . त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत .
दरम्यान याआधी महायुतीचे संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारीवर टीका केली होती , राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्याबद्दल आम्हांला आदरच आहे; पण त्यांचे मूळ जनक घराणे कागलमध्ये आहे. म्हणून आमचाही त्यांच्यावर तितकाच अधिकार आहे. उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात ते आले आहेत; तर केवळ राजर्षी शाहू महाराजांचे काम सांगू नये. तुम्ही काय काम केले आहे हे सांगावे. काहींनी आपल्या स्वार्थासाठी शाहू छत्रपतींना आपला डमी उमेदवार म्हणून उभे केले आहे, अशी थेट टीका त्यांनी केली होती .