अश्विनी भिडे यांच्या नावाची जोरदार चर्चा; भूषण गगराणी यांना मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागार पदाची शक्यतामुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनात महिला नेतृत्वाला सातत्याने प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला मुख्य सचिव मिळाल्या, तर राज्याच्या पोलीस दलाच्या सर्वोच्च पदावरही प्रथमच महिला अधिकारी विराजमान झाल्या. आता मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त नियुक्त करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा मंत्रालयीन वर्तुळात आहे.
मुख्यमंत्री कार्यालयात सध्या कार्यरत असलेल्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे यांचे नाव मुंबई महापालिकेच्या संभाव्य पहिल्या महिला आयुक्त म्हणून पुढे येत आहे. केवळ कामावर फोकस आणि वादापासून दूर राहणाऱ्या अश्विनी भिडे या मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत विश्वासू अधिकारी समजल्या जातात. दुसरीकडे, विद्यमान महापालिका आयुक्त भूषण गगराणी लवकरच निवृत्त होत असून, त्यांच्या दीर्घ प्रशासकीय अनुभवाचा उपयोग राज्य प्रशासनाला व्हावा यासाठी त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

