मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागांचा लाभ घेण्यासाठी बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे फरार आहेत, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या प्रकरणी आमदार नितीन अर्जुन यांनी मूळ प्रश्न उपस्थित केला होता. नागपूर येथील ३२ विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमातीचे बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर करून प्रवेश घेतल्याचे खरे आहे का? तसेच अशा बनावट प्रमाणपत्रांमुळे मूळ अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके म्हणाले की, ३२ विद्यार्थ्यांनी बनावट जात वैधता प्रमाणपत्र दाखल केल्याचे आढळून आले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत.
बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रकरणी दोन सहायक प्राध्यापकांसह एकूण ११ जणांविरुद्ध नागपूर ग्रामीणमधील पाचगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही शिक्षण संस्थेने अनुसूचित जमाती प्रमाणपत्राच्या वैधता प्रमाणपत्राशिवाय अर्जदारांना अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले असल्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्पष्ट केले.

