मुंबई
संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने आज देशभरात ग्रामीण भारत बंद व औद्योगिक संपाची हाक देण्यात आलेली आहे. शेतकरी, कामगार व श्रमिकांच्या मागण्यांसाठी होत असलेल्या आंदोलनामध्ये राज्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी व कामगार संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलने होत आहेत.
हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस हरभजन सिंग सिद्धू यांच्या आव्हानानुसार महाराष्ट्रातील कामगार संघटना आपआपल्या उद्योगांमध्ये संप, मोर्चा, निदर्शने आणि धरणे आंदोलन करून हिंद मजदूर सभेच्या वतीने बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
दिल्लीच्या सीमेवर हमीभावाचा कायदा करावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारच्या वतीने दडपशाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर रबरी गोळ्या अश्रूधूर व लाठीचार्ज करून त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांवर होत असलेल्या या अत्याचाराचा आणि अन्यायाचा धिक्कार आज देशभरात शेतकरी व कामगार रस्त्यावर उतरून करत आहेत, असे किसान सभेचे अजित नवले यांनी सांगितले.
केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांचा अधिक अंत पाहू नये, शेतीचे संकट दूर करण्यासाठी, शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी, उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव देणारा कायदा करावा तसेच शेतीचा उत्पादन खर्च कमी करून नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल यासाठी शेतकरी केंद्री उपाययोजना कराव्यात, कामगारांवर होत असलेल्या अन्यायापासून त्यांना संरक्षण देणाऱ्या उपायोजना करून कामगार व कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची हमी देणाऱ्या उपायोजना कराव्यात अशी मागणी संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने करत आहोत.