मुंबई
निवडणूक आयोगासोबतच राजकीय पक्षांनीदेखील १७ व्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही निवडणुकीच्या तारखा केव्हा जाहीर होतील, याची उत्सुकता आहे. साधारण ५ मार्च दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
मागील लोकसभा निवडणुकीची घोषणा १० मार्च २०१९ रोजी करण्यात आली होती. त्यानंतर ११ एप्रिल ते १९ मे यादरम्यान निवडणूक पार पडली होती. गेल्या वेळी ११ टप्प्यात मतदान झालं होतं आणि तीन दिवसांनी म्हणजे २३ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. यानंतर सहा दिवसांनी ३० मे २०१९ रोजी नवीन सरकार स्थापन होत, नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.
यंदा शाळांच्या परीक्षा झाल्यानंतर निवडणुकीच्या नेमक्या तारख्या ठरवल्या जातील. गेल्या लोकसभेच्या तारखांचं गणित पाहता २९ मेच्या आधी नवीन सरकार स्थापन होणं आवश्यक आहे. त्यानुसार नव्या सरकारने २९ मे २०२४ पर्यंत सत्ता स्थापन करणं अपेक्षित आहे.
भाजप या राज्यांत जास्त जागांवर लढणार?
2019 मध्ये भाजपचा पंजाबचे शिरोमणि अकाली दल, बिहारमध्ये जेडीयू, महाराष्ट्रात शिवसेना, तमिळनाडूत एआयएडीएमके आणि राजस्थानमध्ये हनुमान बैनीवाल यांचा पक्ष आरएलपी यांच्यासह समन्वय होता. भाजपने पंजाबमधील १३ पैकी ३, महाराष्ट्रात ४८ पैकी २५, बिहारमध्ये ४० पैकी १७ जागांवर निवडणूक लढवली होती. तर तमिळनाडूत एआयएडीएमकेने भाजपला पाच जागा दिल्या होत्या. यंदा या राज्यांमध्ये भाजप अधिक जागांवर निवडणूक लढवू शकते.