@therajkaran
छत्रपती संभाजीनगर
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालय वाटप करत असताना मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या संस्थांना झुकते माप दिले आहे. यामुळे भाजप समर्थक तसेच इमाने इतबारे शिक्षण देऊ पाहणाऱ्या अनेक संस्थांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे विधी महाविद्यालय वाटप करत असताना न्याय देऊ पाहणाऱ्या संस्थांवरच अन्याय करत चंद्रकांत दादांनी (Minister Chandrakant Patil) मराठवाड्यात एका वेगळ्या शैक्षणिक वादाला तोंड फोडले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे सर्वात जुने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा (Dr Babasaheb Ambedkar Marathawada University) विद्यापीठ आहे. त्या अंतर्गत यावर्षी नवीन अकरा महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी तीन विधी महाविद्यालय असून त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार असलेल्या संस्थांनाच परवानगी देण्यात आली आहे.
इतर काही संस्थांनी नवीन विधी महाविद्यालयांचा प्रस्ताव दाखल केला होता. परंतु त्या सर्वांवर अन्याय करत त्यांना इरादा पत्र नाकारण्यात आले आहे. असाच काहीसा प्रकार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत झाला आहे.
या विद्यापीठ अंतर्गत असलेल्या ग्रामोदय सेवाभावी संस्था बाबुळगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या संस्थेला तीन महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक वसुमती विधी महाविद्यालय, दुसरे कैलासवासी गोपाळराव पाटील ग्रामीण व्यवस्थापन महाविद्यालय व तिसरी राजे संभाजी व्यावसायिक व कौशल्य विकास वरिष्ठ महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहेत. या संस्थेचे अध्यक्ष अजित पवार गटाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे हे आहेत.
तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांच्याशी संबंधित असलेल्या कैलासवासी वामनराव कदम बोर्डीकर सेवा संस्था जिंतूर, जिल्हा परभणी यांना बोर्डीकर विधी महाविद्यालय सेलू, जिल्हा परभणी येथे मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सेलू येथे दोन विधी महाविद्यालय मंजूर करण्यात आले असून दुसरे महाविद्यालय यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ शास्त्रीनगर सेलूच्या यशवंत विधी महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे भावसार समाजाच्यावतीने महाराष्ट्रातील पहिले भावसार विधी महाविद्यालय, वसमत जिल्हा हिंगोली यासाठी मागणी करण्यात आली होती. भाजपचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी तसेच महाराष्ट्रातून भावसार समाजाच्यावतीने चंद्रकांत दादा पाटील यांना यासाठी निवेदन देखील देण्यात आले होते. तरी देखील त्या निवेदनाला चंद्रकांत पाटील यांनी केराची टोपली दाखवत भावसार विधी महाविद्यालयाला परवानगी नाकारली आहे.
मराठवाड्यात भाजपच्या समर्थकांना नाराजीचा सामना करावा लागत आहे. भाजपेतर आमदार असलेल्या राष्ट्रवादींच्या संस्थांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झुकते माप दिल्याने चंद्रकांत दादांच्या या धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.