मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असताना आणि राज्यातील शासकीय कामकाज मराठीतच करण्याचा कायदा लागू असतानाही आरएसएस नेते भैय्याजी जोशी यांनी ‘मुंबईत मराठी आली नाही तरी चालेल’ असे गंभीर वक्तव्य केल्याने राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या वक्तव्याचा तीव्र निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आज विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. “ही संघ आणि भाजपची मराठीविरोधी मानसिकता आहे. ते राज्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोशींना ‘चिल्लर माणूस’ असल्याचे जाहीर करावे, असे खुले आव्हान दिले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवरही टीका केली. महायुतीच्या आमदारांसाठी ‘छावा’ चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता, मात्र ‘गद्दारांनी’ त्याला दांडी मारली, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
“संघाने हिंदू-मुस्लिम फूट पाडल्यानंतर आता मराठी-अमराठी संघर्ष पेटवण्याचे धोरण आखले आहे,” असा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबईत गल्लीवार प्रांतरचना करण्याचा हा संघाचा डाव आहे.”
त्याचबरोबर, “भैय्याजी जोशींनी असे वक्तव्य गुजरात, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक किंवा बंगालमध्ये जाऊन करावे आणि तेथून सुखरूप परत येऊन दाखवावे,” असे आव्हानही त्यांनी दिले.
“भाजप आणि संघाला वाटते की मराठी जनता त्यांनाच मतदान करेल, त्यामुळे मुंबई तोडण्याचा डाव आखला जात आहे. मात्र हा डाव हाणून पाडला पाहिजे,” असा इशारा देत उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई जिंकायची असेल, तर विकासाच्या स्पर्धेत उतरा, विष कालवून नाही!”