सभागृहाला माहिती न दिल्याने विरोधकांचा तीव्र आक्षेप, सभात्याग
मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती अधिवेशन सुरू असताना सभागृहाला न देता बाहेर जाहीर केल्याने विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला. हा सभागृहाचा आणि संसदीय परंपरांचा अपमान असल्याचा आरोप करत विरोधकांनी थेट सभात्याग केला.
विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे समोर आली. मात्र, मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांनी सभागृहात यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी सरकारवर तीव्र आक्षेप घेतला.
जयंत पाटील म्हणाले, “सभागृह सुरू असताना मंत्री राजीनामा देतात आणि त्याची घोषणा बाहेर केली जाते, ही संसदीय परंपरांची पायमल्ली आहे. हा लोकशाही व्यवस्थेचा अपमान आहे.”
विरोधकांचा गोंधळ, सभात्याग
पाटील यांच्या या आक्षेपानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “संसदीय कार्यपद्धतीला तिलांजली देऊन राजीनाम्याची घोषणा सभागृहाबाहेर करणे चुकीचे आहे,” असा आरोप करत विरोधकांनी त्वरित सभात्याग केला.
विरोधकांनी सरकारने सभागृहात स्पष्ट भूमिका मांडावी, अशी आग्रही मागणी केली असून या मुद्द्यावर पुढील कामकाजात सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.