X: @therajkaran
नागपूर: राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम पंचवीस जिल्ह्यांत पूर्ण झाले आहे. या महिनाअखेर ते सर्व जिल्ह्यांत पूर्ण होईल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, चेंबूर, मुंबई येथील महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा या संबंधीच्या प्रश्नाला प्रश्नोत्तर तासात दिले. यावेळी गृहविभागाकडून फोरेन्सिक अहवाल शिघ्रातिशिघ्र मागवू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
अबू आझमी यांनी आणिक गाव, चेंबूर येथील महापालिका शाळेतील १६ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. ज्यांची ऐपत आहे ते विद्यार्थी हे भोजन घेत नाहीत. मात्र गरीब मुलांना पर्याय नसतो. सबब सदर घटनेची चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे अबू असीम आझमी यांनी केली.
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की संबंधित आहार पुरवठा करणाऱ्या संस्थेचे काम काढून घेतले आहे व गुन्हा दाखल केला आहे. मात्र सदस्यांचे समाधान होत नव्हते. कॉंग्रेस सदस्या वर्षा गायकवाड यांनी आक्रमकपणे विषय लावून धरला. घाटकोपर येथेही भोजनात अळ्या सापडल्या. मंत्री महोदयांनी अचानक भेट देऊन पाहणी करावी. विद्यार्थ्यांसाठी २७ वस्तूंची खरेदी होते पण त्यांच्यापर्यंत त्या पोहचत नाही, याकडे वर्षा गायकवाड यांनी लक्ष वेधले.
शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी आपण स्वतः मध्यवर्ती भोजन निर्मिती केंद्रास भेट देऊ. ग्रामीण भागात जे नियम आहेत तेच शहरांतही लागू करू असे स्पष्ट केले. मनिषा चौधरी, अशोक चव्हाण यांनीही उपप्रश्न विचारले.
Also Read: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्या : अंबादास दानवे