संभाजीनगर- लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुतीत ज्या जागेचा वाद होता. त्या वादावर अखेरीस पडदा पडलाय. छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे लढतील असं स्पष्ट झालेलं आहे. कॅबिनेटमध्ये रोहयोमंत्री असलेल्या आणि संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी असलेल्या भुमरेंना मुख्यमंत्र्यांनी मोठी संधी दिल्याचं मानण्यात येतंय. भुमरे यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हेही असणार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेले मात्र तिकीट मिळाले नसल्यानं बंडखोरी करणारे मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते विनोद पाटील आणि हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून रिंगणात असणार आहेत.
खैरैंचं मोठं आव्हान
चंद्रकांत खैरे हे संदीपान भुमरे यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. दोन वेळा आमदार, चार वेळा खासदार, पालकमंत्री असा त्यांचा मोठा अनुभव आहे. भुमरे यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी त्यांची उमेदवारी जाहीर झालेली असल्यानं त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. खैरे यांना मानणारा मोठा वर्ग असल्यानं भुमरे यांच्यासमोर मोठं आव्हान असल्याचं सांगण्यात येतंय.
इम्तियाज जलील निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत?
एमएमआयचे राज्यातील एकमेव खासदार इम्तियाज जलील या मतदारसंघातून निवडून गेलेत. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, ते ही जागा लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगण्यात येतंय. मात्र मतविभाजनासाठी जलील यांनी निवडणूक लढवावी असा महायुतीकडून दबाव असल्याची चर्चा आहे. जलील दीड ते दोन लाख मतं घेऊ शकतात. विनोद पाटील यांनाही महायुतीकीडून मतविभाजनासाठी मैदानात उतरवलं असल्याची चर्चा आहे.
मराठा मतांच्या फुटींमुळे कुणाला फायदा?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका चंद्रकांत खैरे यांना बसला होता. यावेळी तर विनोद पाटील, हर्षवर्धन जाधव आणि शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हेही रिंगणात आहेत. या मतविभाजनाचा फटका खैरे, भुमरेंना बसणार की भुमरेंना या अपक्ष उमेदवारांचा फायदा होणार, हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःपालघर लोकसभा मतदारसंघात बविआची बैठक सुरू, विजयाची खात्री , त्यामुळे इच्छुक अनेक