मुंबई
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीदरम्यान त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना असं वक्तव्य केलं. यावेळी ते म्हणाले की, माझा दोन वेळा पराभव झाला आहे. तरीही प्रणितीताई शिंदे आणि मला भाजपची ऑफर आहे. मात्र जरी भाजपने ऑफर दिली तरी काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असंही ते पुढे म्हणाले.
एकनाथ शिंदेंची बंडखोरी आणि त्यानंतर अजित पवारांनी पक्षातून फुटून भाजप-शिंदेंना समर्थन दिल्यानंतर भाजप हा फोडाफोडीचं राजकारण करीत असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा गट फुटल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. परिणाम भाजपकडून त्यांना ऑफर असल्याचंही सांगितलं जात होतं. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही याबाबत मोठं विधान केलं आहे.
भाजपची खुली ऑफर – शिंदे
माझा निवडणुकीत दोन वेळा पराभव झाल्यानंतरही मला आणि प्रणितीताई शिंदेंना भाजपकडून ऑफर होती. पण आता ते कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो, जिथं आमचं बालपण आणि तारुण्य गेलं, त्याला कसं विसरायचं? आता मी ८३ वर्षांचा आहे. आता मी दुसऱ्याचं म्हणणं बरोबर आहे, असं कसं म्हणणार? प्रणितीही पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही असंही सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हणाले.