मुंबई
‘सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर रांगेत, जामीनावर बाहेर असलेला कुख्यात गुंड निलेश घायवाळ याची मंत्रालयात येऊन रिलबाजी करण्याची हिंमत कशी होते’, असा सवाल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
महायुती सरकारकडून गुंडांना अभय दिलं जात असून मुख्यंत्र्यांना गुंड राजरोसपणे भेटतोय. जामीनावर बाहेर असलेल्या निलेश घायवाळ गुंडाकडून मंत्रालयात रिलबाजी करण्यात आली, सामान्य माणूस मात्र मंत्रालयाबाहेर रांगेत उभा आहे. यालाच म्हणायचे का अच्छे दिन, असं म्हणत वडेट्टीवारांनी संताप व्यक्त केला.
महायुती सरकार राज्यातील गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहेरबानीने हे गुंड राजरोस फिरत आहेत. जामीनावर सुटलेला गुंड निलेश घायवाळ मुख्यमंत्र्यांना भेटतो. मंत्रालयात बिनधास्त फिरतो. मंत्रालयात रिल्स बनवतो. सामान्य माणूस मात्र रांगेत उभा असतो. यालाच म्हणायचे का अच्छे दिन असा, सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी गुंडांना राजाश्रय मिळत असल्याच्या मुद्यांवरून सरकारवर आज पुन्हा तोफ डागली.
मुंबई येथे ‘प्रचितगड’ या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, रोज एक नवा गुंड सरकारच्या भेटीला येत असून सरकारमधील मंत्र्यांना, काही मंत्र्यांच्या मुलांना याचे काहीच वाटत नाही. म्हणजे सरकार गुंडांना अभय देत असून या सरकारच्या काळात गुंडाराज सुरू असल्याचे स्पष्ट आहे. गुंड मंत्रालयात बिनधास्त फिरतायत आणि सामान्य जनता मात्र बाहेर रांगेत उभा असते. याची सरकारला लाज देखील वाटत नाही.
पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती “मोदी की गॅरेंटी” ? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला.
पुण्यातील गँगस्टर म्हणून ओळख असलेला निलेश घायवळ या रिलमध्ये दिसून येत आहे. आज सकाळी निलेश घायवळ याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. निलेश घायवळ याच्याविरोधात पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे, खून, खूनाचा प्रयत्न असेही गुन्हा त्याच्यावर दाखल आहेत. २०२१ मध्ये पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात मोक्काची कारवाई केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी एक वर्षासाठी येरवडा कारागृहात त्याला स्थानबद्ध केलं होतं.
 
								 
                                 
                         
                            
