हातकणंगले : शिंदे गटाची उमेदवाराची यादी समोर आल्यानंतर हातकणंगलेचा तिढा सुटला आहे. येथून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील माने यांनी कोल्हापूरचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं, कार्यकर्त्यांनीही आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. मात्र या जागेवरुन धैर्यशील माने यांना हातकणंगलेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचं आव्हान असणार आहे. राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र राजू शेट्टींनी यास नकार दिला आणि पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली.
राजू शेट्टी विरोधात धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची स्पष्टता अद्यापही आलेली नाही. मविआ वेगळा उमेदवार उभा करणार की राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार याबाबतही नेमकी स्पष्टता नाही. दुसरीकडे मविआकडून सत्यजित पाटील सरूडकर आणि सुजित मिनचेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झालीये.चेतन नरके यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीबाबत विचारणा केली होती, मात्र त्यांनीही हातकणंगलेसाठी इच्छुक नसल्याचं कळवलंय
या सगळ्या घडामोडीत धैर्यशील माने यांच्या उमेदवारीमुळं राहुल आवाडे नाराज झाले आहेत. आता राहुल आवाडे ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी राहुल आवाडे यांनी लोकसभा लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं होतं. महायुतीवर नाराजी व्यक्त केल्यानं आता त्यांची भूमिका काय याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे राहुल आवाडे लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतंय. आवाडेंना मविआनं तिकिट दिल्यास, ही लढत तिरंगी आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत राहुल आवाडे ?
राहुल आवाडे हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंचे पुत्र आणि माजी खासदार कल्लापा आवाडे यांचे राहुल आवाडे नातू आहेत. राहुल आवाडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असून आवाडे कुटुंबीयांची मतदारसंघात मोठी राजकीय ताकद आहे. शिक्षण संस्था, सहकारी बँक, वस्त्रोद्योग, साखर कारखाना अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांचे बळ त्यांच्या पाठिशी आहे.
आवाडे यांच्या एन्ट्रीमुळं धैर्यशील माने आणि राजू शेट्टी या दोन्ही उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. राजू शेट्टींना पाठिंबा देण्याचा निर्णय मविआनं घेतला नाही, तर ठाकरेंची शिवसेना मतदारसंघात उमेदवार देऊ शकते. त्यामुळं उद्धव ठाकरेंशी राहुल आवाडे यांच्या भेटीत नेमकं काय होणार, हे आता पाहावं लागणार आहे.