शिवतारेंचे बंड स्क्रिप्टप्रमाणेच झाले थंड
X : @ajaaysaroj
मुंबई: जनतेचे प्रश्न सोडवण्याची हमी मिळाल्याने आपले समाधान झाले आहे, अशी मखलाशी करून स्वतःचा मतलब साधत शिवसेनेचे आक्रस्ताळे नेते विजय शिवतारे यांनी स्वतःच्या फुगवलेल्या फुग्याला स्वतःच टाचणी लावली आहे. महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू आता त्यांनी स्वतःच्या गळ्यात हार म्हणून घातला असून पोळीवर तूप मिळाल्यानेच विजयबापू चूप झाले अशी चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा उमेदवार म्हणून सुरू झाल्यावर लगेचच शिवसेनेचे नेते विजयबापू शिवतारे यांनी दबावाचे राजकारण खेळायला सुरुवात केली होती. हा दबाव खासकरून अजितदादा यांच्यावरच असावा अशी खेळी शिताफीने खेळली गेली. अखेरच्या टप्प्यात त्यांनी कोणाच्या उपस्थितीत तडजोड केली याचे नीट आकलन केले तर विजयबापूंची स्क्रिप्ट नक्की कोणाकोणाच्या लेखणीतून लिहिली गेली होती हे लक्षात येते. राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवतारेंना कोणीतरी स्क्रिप्ट लिहून देत आहे, त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, ही उपस्थित केलेली शंका म्हणूनच रास्त ठरते.
बारामती लोकसभा मतदारसंघात शिवतारे यांचा पुरंदर विधानसभा मतदारसंघ येतो. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पुरंदर येथील पालखी तळावरील जाहीर सभेत विजयबापूंना, तुमची औकात किती, आवाका किती, तुम्ही बोलता किती, असे सुनावले होते. या निवडणुकीत तुम्ही कसे जिंकून येता अशी आव्हानात्मक भाषा करत शिवतारे यांना चारी मुंड्या चित केले होते. अजितदादांनी केलेला अपमान शिवतारे बापूंच्या जिव्हारी लागला होता पण राजकारणात वस्ताद असलेल्या बापूंनी हा अपमान तब्बल पाच वर्षे गिळला होता. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाल्यावर मात्र बापूंनी त्यांचा खरा रंग दाखवला. स्क्रिप्ट रायटरचे थेट आशीर्वाद असल्याने अत्यंत हुशारीने शरद पवार, अजित पवार अशा सर्वच पवार कुटुंबियांचे वाभाडे काढत त्यांना टार्गेट करायला शिवतारेंनी लगेचच सुरुवात केली.
रूरल टेररिझम म्हणजेच ग्रामीण दहशतवादाचे जनक हे शरद पवारच आहेत, त्यांनी संपूर्ण ग्रामीण पट्ट्यात दहशतवाद जोपासला आहे असा थेट हल्ला शिवतारे यांनी पवारांवर केला. तर अजित पवार म्हणजे मोदींरूपी महादेवाच्या पिंडीवर बसलेला जहरी विंचू आहे अशा अत्यंत विखारी भाषेत अजितदादांची निर्भत्सना केली. सुप्रिया सुळे या फक्त सेल्फी काढणाऱ्या राजकारणी असून गेल्या पाच वर्षात त्यांनी एकही काम केलेले नाही. एखाद्या संस्थेने दिलेले संसदरत्न पुरस्कार म्हणजे कार्यक्षमतेचे मापदंड नाही अशी जाहीर टीका बापूंनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती. निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या, उमेदवार जाहीर करायचे दिवस जसे जवळ आले, तशी शिकार टप्प्यात आली आहे याची खात्री बापूंना व त्यांच्या राजकीय गुरूंना झाली. शेवटी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजितदादा पवार यांच्या बरोबर सुरू असलेली तुमची नुरा कुस्ती संपली आहे याची जाणीव बापूंना करून दिली गेली आणि दिलजमाई घडवण्यात आली. या बैठकीत स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा अपमानाचा बदला घेण्यासाठी ही बंडखोरी नसून, केवळ पुरंदरच्या नागरिकांना सुखसुविधा मिळाव्यात याच उदात्त हेतूने आपण हे सगळे केले आहे, मतदारसंघातील मागण्या पूर्ण कराव्यात एवढीच आपली इच्छा आहे असे बापूंनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
या मागण्यांमध्ये उत्रोली तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचा मुद्दा, बारामतीमधील सुपे परगणा येथील दुष्काळी भागाला नीरा नदीमधून एक्सप्रेस वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणे, पुरंदर येथील अनेक वर्षे रखडलेला विमानतळ प्रकल्प आणि दिवे भागातील राष्ट्रीय शेती बाजार प्रकल्प तातडीने मार्गी लावणे, व गुंजवणी धरणातून पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करणे या पंचसूत्री मागण्या त्वरित मार्गी लावल्या जातील अशी हमी विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याकडून घेतली असल्याचे सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत पुरंदर मतदारसंघात ढवळाढवळ करायची नाही असा वायदा देखील घेण्यात आल्याची चर्चा आहे. या दिलजमाईने अजित पवार यांनी केवळ घरातील निवडणूक असल्याने निश्वास सोडला असेल, पण लोकसभा निवडणूक संपल्यानंतर जेंव्हा हेच अजितदादा नव्या दमाने श्वास घेतील तेंव्हा त्यांची भूमिका विजयबापूंबद्दल काय असेल हे बघणे रंजक ठरणार आहे. भाजपशी जुळवून घेणारे अजित पवार विजयबापूंच्या खेळीला कसे उत्तर देतात ते विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान स्पष्ट होईलच.