सातारा : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी उदयनराजेंची नक्कल करीत कॉलर उडवून दाखवली. त्यांनवी कॉलर उडवल्यानंतर एकच हशा पिकला.
उदयनराजे यांनी साताऱ्याच्या जागेसाठी संपर्क केला का? च्याशी तुम्ही चर्चा करणार आहात का? असा सवालही शरद पवार यांना केला. उदयनराजेंसारखी कॉलर उडवणार का? असा सवालही यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्यामुळे एकच हशा पिकला. आपल्या या नकलेवर खुद्द शरद पवारही दिलखुलास हसले.
पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्याची जागा देणार का, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर साताऱ्याची जागा राष्ट्रवादीची आहे, त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीचाच उमेदवार राहणार. उदयनराजेंनी आपल्याशी संपर्क केला नसल्याचं पवारांनी यावेळी सांगितलं. श्रीनिवास पाटील वैद्यकीय कारणामुळे निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे साताऱ्याबाबत काय निर्णय घ्यायाच याबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मनाचा कानोसा घेण्यात आला आहे. दोन चार लोकांची नावे सुचवली गेली आहेत. संध्याकाळच्या बैठकीत अहवाल मांडून विचारविनियम केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.