मुंबई : मुंबई, पालघर, पुणे, नाशिक आणि राज्यातील इतर भागांत झालेली अतिवृष्टी ही राज्यावरील मोठी आपत्ती आहे. चार दिवसांतील विक्रमी पावसामुळे आतापर्यंत विविध कारणांनी ६३ जणांचा बळी गेला आहे. जनता संकटात आहे, त्यामुळे कृपया या विषयाचे राजकारण होऊ नये, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत केले.
अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनावरील अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना महाजन बोलत होते.
“मी आताच पुण्याहून आलो आहे. दीड दिवसांत ६३५ मिमी पाऊस झाला. १९८२ पासूनचा कचरा डेपो होता. तो इमारतीवर कोसळला. त्या ढिगाऱ्याखाली २३ लोक अडकले होते. त्यापैकी ११ जणांना बाहेर काढण्यात आले असून सहा जण जखमी आहेत. आत अडकलेले लोक काही तासांपासून ढिगाऱ्याखाली आहेत; ते सुरक्षित असतील का, हे सांगणे कठीण आहे,” अशी माहिती महाजन यांनी दिली.
काही जिल्ह्यांमध्ये आजही पुरेसा पाऊस नाही; मात्र ज्या भागांत पाऊस झाला, तेथे अल निनोच्या सूचनांनंतरही अतिवृष्टीची तीव्रता प्रचंड होती, असे ते म्हणाले. काही ठिकाणी ४०० ते ४५० मिमी पाऊस, वादळी वारे आणि समुद्राला भरती अशी परिस्थिती निर्माण झाली. समुद्राचे पाणीही किनाऱ्याकडे येत असल्याने संकट अधिक गंभीर झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
“हे संकट मोठे आहे. पाणी उतरावे लागेल. ज्या ज्या ठिकाणी पाऊस होत आहे, त्या ठिकाणी आम्ही धावून जात आहोत. शासन कुठेही कमी पडत नाही,” असे महाजन यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात स्थिती गंभीर असून तेथे मोबाइल नेटवर्कची मोठी अडचण आहे. संबंधित कंपन्यांशी चर्चा केली असून त्यांच्या यंत्रणा पाण्याखाली गेल्याने नेटवर्क सुरू होण्यात अडथळे येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना अन्नधान्याचे किट देण्यात आले आहेत. या अतिवृष्टीकाळात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. सभागृहाने निर्णय घेतल्यास अधिक मदतही देता येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेबाबत बोलताना महाजन म्हणाले की, “लिंकला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. या आपत्तीच्या काळात लोकांना शक्य ती सर्व मदत केली जाईल.”


Deshawn Hippley
July 9, 2026I really enjoy studying on this site, it has got excellent articles. “Something unpredictable but in the end it’s right, I hope you have the time of your life.” by Greenday.