X: @therajkaran
बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या हिंसाचाराची एस्.आय्.टी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आरोपी कोणत्याही राजकीय पक्षातील असोत, कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या हिंसाचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सदस्य संदीप क्षीरसागर यांचे घर जमावाने जाळले होते. क्षीरसागर यांनी याविषयीची लक्षवेधी सूचना विधानसभा नियम-१०५ अन्वये सभागृहात उपस्थित केली होती. यासंदर्भात व्यथा मांडताना क्षीरसागर म्हणाले, पोलिसांनी जमावाला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. जमावाला प्रारंभीच अडवले असते, तर पुढील दुर्घटना घडली नसती. पोलिसांची संख्या अपुरी होती, तर अन्य जिल्ह्यातून पोलीस सहाय्य घ्यायला हवे होते. ह्या नियोजनबद्ध हिंसाचाराची चौकशी व्हावी, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनीही या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘दुर्घटनास्थळी पोलिसांच्या तुलनेत जमाव अधिक होता. कारवाई केली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. हिंसाचार वेगवेगळ्या ठिकाणी घडला. काही लोक ३-४ ठिकाणी दिसत आहेत. आतापर्यंत यासंदर्भात २७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.त्यापैकी ३० हे सराईत आहेत. अद्यापही माजलगाव येथील ४०, बीड येथील ६१ आरोपी सापडलेले नाहीत. अटक झालेल्यांच्या विरोधात सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत. प्रत्येकाचे ‘मोबाईल लोकेशन’ही पडताळण्यात आले आहे. दुर्घटनेतील ‘मास्टर माईंड’ कोण आहे, याची असून चौकशी होत आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून कारवाईपासून आम्ही मागे हटणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षातील असले तरी कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Also Read: ठाकरे गटाचा नेता सुधाकर बडगुजरचे सलीम कुत्तासोबतचे सबंध तपासणार: देवेंद्र फडणवीस