Twitter: @vivekbhavsar
मुंबई
पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने रान उठवल्याने अस्वस्थ झालेले गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षे पोलीस भरती केली नाही, अशी टीका करणारे देवेंद्र फडणवीस एक गोष्ट विसरले की ठाकरे सरकारमध्ये एक वर्षाहून अधिक काळ दिलीप वळसे – पाटील गृहमंत्री होते आणि तेच वळसे – पाटील आज शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत. मग फडणवीस वळसे – पाटील यांना देखील जबाबदार धरणार का? असा प्रश्न विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जात आहे.
शंभर कोटी रुपये वसुलीच्या तथाकथित आरोपामुळे तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली आणि त्यांना जेलमध्ये जावे लागले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक नेता धास्तावला होता. गृहमंत्री पद स्वीकारण्यास कोणीही तयार नव्हता. अजित पवार आणि जयंत पाटील यांना ही जबाबदारी स्वीकारण्यास सांगण्यात आले होते, मात्र, दोघांनीही हे पद म्हणजे डोकेदुखी आणि बदनामी ओढवून घेणारे असल्याचे सांगत गृहमंत्री पद स्वीकारण्यास नकार दिला होता. अखेर प्रकृतीची समस्या असतांनाही दिलीप वळसे – पाटील यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली.
एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईपर्यंत दिलीप वळसे – पाटीलच राज्याचे गृहमंत्री होते. मात्र, राज्याच्या इतिहासातील अत्यंत निष्क्रिय गृहमंत्री असा ठपका त्यांच्यावर बसला, मंत्रालयातील सनदी अधिकारी आणि भारतीय पोलीस सेवेतील (IPS) वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत असत.
एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांने गप्पांच्या ओघात सांगितले होते की, अनिल देशमुख प्रकरणाचा वळसे – पाटील यांनी इतका धसका घेतला होता की कोणी वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांना भेटायला मंत्रालयातील त्यांच्या दालनात गेला तर मंत्री वळसे- पाटील दालनाचा दरवाजा उघडा ठेवत असत. पण यामुळे पोलीस अधिकाऱ्याला जी गोपनीय माहिती मंत्र्यांना द्यायची असायची, ती देता येत नसे.
विरोधक आणि सनदी अधिकाऱ्यांच्या नजरेत निष्क्रिय असलेले हेच दिलीप वळसे – पाटील आज अजित पवार यांच्यासोबत बंडात सहभागी झाले आणि आता शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद भूषवत आहेत.
उद्धव ठाकरे सरकारचा कालावधी 2 वर्षे २१४ दिवसांचा. उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकारमध्ये दिलीप वळसे – पाटील ५ एप्रिल २०२१ पासून जवळपास १४ महिने गृहमंत्री होते. त्यांनीही कधी पोलीस भरतीसाठी पुढाकार घेतला नाही, ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का विसरतात? असा सवाल विरोधी पक्ष करत आहे. पोलीस भरती न करणारे वळसे – पाटील आणि त्यांचे म्होरके अजित पवार आज फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, ते फडणवीस यांना कसे चालते? असाही सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.
पोलीस खात्यातील कंत्राटी भरतीला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेताना केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे देवेंद्र फडणवीस हे कधीतरी अजित पवार आणि दिलीप वळसे – पाटील यांना याचा जाब विचारणार आहेत की नाही? असाही सवाल शरद पवार गटाने उपस्थित केला आहे.