मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीसाठीची बारावी यादी आज जाहीर करण्यात आली आहे . या यादीत सातारा लोकसभा (Satara Lok Sabha )मतदारसंघात महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे . या मतदारसंघात त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) रिंगणात आहेत . त्यामुळे आता या मतदारसंघात कोणाचं पारडं जड जाणार यावर सध्या साताऱ्यात चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान उमेदवारी जाहीर होताच उदयनराजे भोसले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे . मला उमेदवारी मिळणारच होती , उमेदवारीबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव संकल्पना राबवली. तोच विचार उराशी बाळगून मी 30 वर्ष लोकांची सेवा करतोय. त्यामुळे लोकांचे भरभरुन आशिर्वाद मला मिळाले. तरुण, माता-भगिनींची साथ मिळाली” असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत .
महायुतीच्या विकास कामाचं कौतुक करत ते म्हणाले , माझे मित्र आणि माजी मुख्यमंत्री तसंच आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चांगल्या विकासाची कामं महाराष्ट्रात झाली आहेत . कारण जेव्हा अस्थिर सरकार असतं तेव्हा प्रत्येकजण दबाव टाकत असतं. त्यामुळे निर्णय घेताना अडचणी येत असतात. केंद्रात आणि राज्यात खंबीर सरकार आहे. विकासकामं होत आहेत, झाली आहेत. लोकांना अपेक्षित असलेली त्यांची हिताची कामं या सगळ्यांकडून केली जातील असा मला विश्वास वाटतो. असं उदयनराजेंनी म्हटलं .आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आहे. याआधी वेगवेगळ्या पक्षांची बरीच सरकारं येऊन गेलीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ते खऱ्या अर्थाने मोदींच्या राजवटीत राबवले जात आहेत. विकासकामं सुरु आहेत असे त्यांनी सांगितलं .
दरम्यान याआधी २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही निवडणुकांच्या वेळी उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरच लढले होते. २०१९ ची निवडणूक जिंकल्यानंतर काही महिन्यांतच उदयनराजे यांनी खासदारकी सोडली आणि राजीनामा देऊन भाजपात जाणं पसंत केलं. रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली तेव्हा त्या पोटनिवडणुकीत ८७ हजार मतांनी पराभव झाला होता. आता भाजपाने उदयनराजेंना पुन्हा लोकसभेची उमेदवारी उदयनराजेंना दिली आहे. ज्यानंतर कॉलर उडवत उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.