कोची – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेत असतो, परिस्थितीनुसार पक्षाची भूमिका ठरते, असे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात पक्ष एनडीए आघाडीचा भाग आहे, तर नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आमदार आहेत. दिल्लीत पक्षाने भाजपविरोधात सुमारे ३० जागांवर निवडणूक लढवली. केरळमध्ये पक्षाने नेहमी विशिष्ट मूल्ये जपली असून, सध्या कोणत्याही आघाडीचा भाग नसून स्वतंत्र भूमिका घेत आहे. भविष्यातील आघाड्यांबाबत निर्णय राज्य पातळीवर घेतला जाईल, असे पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य अधिवेशन एर्नाकुलम येथील राजेंद्र मैदान येथे आज संपन्न झाले. या अधिवेशनात राज्यातील राजकीय परिस्थिती, पक्षाची भविष्यातील दिशा आणि महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव तसेच राज्याध्यक्ष एन.ए. मोहम्मद कुट्टी उपस्थित होते.
सध्या पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष बळकट करणे आहे. राज्याध्यक्ष पी. सी. चाको यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन पक्षाला नवी ऊर्जा देईल, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.
या परिषदेत पक्षाच्या आगामी धोरणांबाबत तसेच राजकीय रणनीतीबाबत वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून धोरणात्मक आखणी केली.
या अधिवेशनाच्या तयारीचा भाग म्हणून ११ ते १७ फेब्रुवारीदरम्यान कासरगोड ते तिरुवनंतपुरमपर्यंत जनसंवाद दौरा करण्यात आला. या दौऱ्यात स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पक्षाच्या कार्यप्रणालीबाबत जनजागृती करण्यात आली.