X : @therajkaran
मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (LoP Rahul Gandhi) हे देशातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत आहेत. त्यांनी जातनिहाय जनगणना (Cast wise census) करण्याची मागणी लावून धरली आहे, म्हणूनच चिडून भाजपाच्या खासदाराने लोकसभेत राहुल गांधी यांची जात विचारली. भाजपाने जात विचारून फक्त राहुल गांधी यांचाच अपमान केला नसून एससी, एसटी, भटक्या विमुक्त, आदिवासी, मागास तसेच ओबीसी समाजाचा भाजपाने अपमान (BJP insulted OBC and backward class) केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व भारतीय जनता पक्षाने या समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींना जात विचारल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जसा संताप आहे, तसाच बहुजन समाजामध्येही भाजपाविरोधात तीव्र संताप आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन केले व भाजपाच्या या मनुवादी वृत्तीचा जाहीर निषेध केला. जात विचारणाऱ्या भाजपा खासदार अनुराग ठाकूर (BJP MP Anurag Thakur) यांची माफी नको, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. कितीही अपमान केला, शिव्या दिली तरी बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार व जातनिहाय जनगणना करणार यावर राहुल गांधी ठाम आहेत. अनुराग ठाकूरच्या विधानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केले हे अत्यंत गंभीर आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हा मुख्यालयी आंदोलन करत भाजपा व खासदार अनुराग ठाकूर यांचा निषेध केला.
मविआच्या जागा वाटपाची बैठक ७ ऑगस्टला..
विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची (seat sharing discussion of MVA) चर्चा अद्याप झालेली नसल्याने कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. ४ तारखेला प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) मुंबईत येत असून जागा वाटपासाठी गठीत केलेल्या समितीच्या काँग्रेस नेत्यांशी आधी चर्चा होईल व त्यानंतर ७ तारखेला महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) बैठक होईल, त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा होईल. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात चर्चा झाली असून आपलीही उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
राज्यात आमदारच सुरक्षित नाहीत..
राज्यातील कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आला तर आज विरोधी पक्षाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. राज्यातील आमदारच सुरक्षित नाहीत. देवेंद्र फडवणीस हे राज्याला लाभलेले आतापर्यंतचे सर्वात निष्क्रीय व दुबळे गृहमंत्री आहेत. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व गृहमंत्री यांचा खालच्या पोलीसांवर प्रचंड दबाव आहे. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावर अवैध नियुक्ती करण्यात आली असून त्या भाजपासाठी काम करत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास गृहमंत्री व पोलीस महासंचालकच जबाबदार असून दोघांनीही राजीनामा द्यावा, असे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले म्हणाले की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागतच आहे, परंतु सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करेल की नाही याबाबत शंका आहे. दुसरीकडे भाजपा सरकार एससी, एसटींना ओबीसीप्रमाणे क्रीमी लेअरची मर्यादा घालून आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.