रांची
झारखंडसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. दुपारी १ वाजता मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. 20 जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सुमारे सात तास चौकशी केली होती. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात येणार आहे. ईडीने सोरेन यांना आतापर्यंत १० वेळा समन्स पाठवलं आहे.
आज दुपारी होणाऱ्या चौकशीत कथित जमीन घोटाळा प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे. यावेळी त्यांना अटक केली जाऊ शकते, असंही म्हटलं जात आहे. अटकेची शक्यता असल्याने आता मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून लढाई सुरू झाली आहे. हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता असताना हेमंत सोरेन यांची वहिनी सीता सोरेन (आमदार) यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे.
मुख्यमंत्रिपदावरुन राडा
झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. निशिकांत दुबे म्हणाले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या बैठकीला केवळ 35 आमदार उपस्थित होते. निशिकांत दुबे पुढे म्हणाले, झालेल्या बैठकीत हेमंत यांची वहिनी सीता सोरेन आणि बसंत सोरेन यांनी कल्पना सोरेन यांचा विरोध व्यक्त केला. याचाच अर्थ विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. निशिकांत दुबे यांनी असा दावाही केला आहे की सीएम सोरेन ईडीच्या चौकशीत सहभागी होणार नाहीत.