मुंबई : गेल्या काही दिवसापासुन चर्चेत असलेल्या कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha )मतदारसंघात महायुतीकडून अजूनही उमेदवार ठरलेला नाही. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा जागेचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे .महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या आयोध्या पोळ (Ayodhya Poul)यांना निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे( Shrikant Shinde)हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. परंतु, श्रीकांत शिंदे यांना यंदा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण असताना ठाकरे गटाने मात्र या मतदारसंघासाठी त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार ठरायच्या आधीच महाविकास आघाडीने येथे बाजी मारली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .
लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षानी जोरदार तयारी सुरु केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या पक्षाच्या आठ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. मात्र त्यांनी त्यांच्या मुलाची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना स्थानिक भाजपा नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तसेच हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी भाजपा नेते आग्रही आहेत. त्यामुळे या जागेबाबत महायुतीत तिढा निर्माण झाला आहे.अशातच आता ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांना कल्याण लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे.
दरम्यान अयोध्या पौळ यांनी स्वतःच एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे. ज्यांच्याकडे ईडी (अंमलबजावणी संचालनालय), आयटीसारखी (आयकर विभाग) ताकद आहे, स्वयंघोषित जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा पक्ष ज्यांच्याबरोबर युतीत आहेत अशा मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे, संजय राऊत, वरुण सरदेसाई आणि साईनाथ दर्गे यांचे आभार.