X: @therajkaran
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha) महाविकास आघाडीकडून शाहू महाराज (Shahu Maharaj) निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. आपल्याच पक्षाच्या तिकिटावर महाराजांनी लढावं यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.
यासाठी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी (Satej Patil) पुढच्या आठ दिवसात ढोल वाजवणार, काठी बडवणार आणि भंडारा उधळणार आहेत, असे जाहीर करत पाटील यांनी शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) प्रचाराचा नारळ फोडला आहे.
महाविकास आघाडी (MVA) कडून शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाली असली तरी महायुतीसमोर उमेदवाराचा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) हे पु्न्हा इच्छुक आहेत. पण महाराजांच्या विरोधात राजघराण्यातील समरजीतसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांना उमेदवारी द्यावी असा जोर भाजपकडून धरण्यात आला आहे. असं झालं तर शाहू महाराज विरुद्ध समरजीतसिंह घाटगे अशी राजघराण्यातील व्यक्तींची लढत होणार आहे.
दरम्यान, सध्याच्या राजकारणावर टीका करताना सतेज पाटील म्हणाले की, सकाळचा माणूस संध्याकाळी कुठे असेल हे सांगता येत नाही. कोल्हापूर जागेसंदर्भात दिल्लीमध्ये बैठक होती, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कार्यक्रमामुळे मी तिकडे गेलो नाही. आता पुढच्या आठ दिवसांनी ढोल वाजवणार, काठी बडवणार आणि भंडारा उधळणार, असं त्यांनी सांगितले.
लोकसभेसाठी शाहू महाराजांचे नाव अंतिम असून त्यांच्या प्रचाराची धुरा काँग्रेसचे नेते सतेज पाटलांकडे असणार आहे. पक्ष कोणताही असला तरी प्रचाराची सर्व सूत्र मात्र त्यांच्याच हाती असणार आहे नक्की.