मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी(Loksabha election ) भाजपने 23 जागांवरती उमेदवार घोषित करून 5 विद्यमान खासदारांना घरचा रस्ता दाखवला आहे. यामधील मुंबईमधील दोन जागांचा समावेश आहे. प्रितम मुंडे(Pritam Munde) यांचा पत्ता कट करून पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रपूरच्या जागेवर ज्या ठिकाणी 2019 मध्ये काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता, त्याठिकाणी मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. भाजपकडून दावा करण्यात आलेल्या जागांमध्ये अमरावती, परभणी, नाशिक, मुंबईमधील तीन जागा आणि पूनम महाजन यांची जागा तसेच आणि कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेचा समावेश आहे. या जागा भाजप घेणार की शिंदे गटालाच दिल्या जाणार याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता कायम आहे.
दरम्यान मुंबई उत्तर मध्ये या जागेवरती पुनम महाजन (Poonam Mahajan )यांची उमेदवारी मात्र अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही.जाहीर न केलेल्या जागांमध्ये अमरावती, परभणी, नाशिक, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई, रायगड, धाराशिव, मावळ, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जागांवर शिंदेंचा उमेदवार असणार की भाजपचा असणार यावर अजूनही चर्चा सुरुच आहे. या जागांवर शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि अजित पवार गटातील खासदार आहेत. यामधील शिंदेंच्या खासदारांवर नाराजी असलेल्या जागांवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे.
तसेच शिंदेंकडील नाराजी असलेल्या खासदारांचा पत्ता कट करावा, अशी मागणी भाजपकडून (BJP)करण्यात येत आहे, पण शिंदे पाठिंबा दिलेल्या 13 खासदारांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र, भाजपकडून विरोध असल्याने वाद वाढत चालला आहे. त्यामुळे याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडील एकही उमेदवार आतापर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही. शिंदे गटाकडून सुद्धा एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.