चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर या मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अनेक नावांची चर्चा होती. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची लेक शिवानी वडेट्टीवार या जागेसाठी आग्रही होती. त्यांनी थेट दिल्लीवारीही केली होती. तर दुसरीकडे दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोकरक यांनी या जागेवर आधीच दावा केला होता. त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याबाबत निश्चितता नव्हती. तर चंद्रपूरातून वडेट्टीवारांना स्वत: उभं राहण्याचा सल्ला काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून दिल्याचीही चर्चा होती. मात्र वडेट्टीवारांनी याला नकार दिल्यानंतर आता उमेदवारी प्रतिभा धानोरकरांच्या पदरात पडली आहे. विजय वडेट्टीवारांनी आपल्या लेकीसाठी केलेले प्रयत्न फोल ठरले आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर या मतदारसंघामुळे काँग्रेसची लाज राखली गेली. कारण राज्यात एकमेव उमेदवार निवडून आलेला मतदारसंघ म्हणून चंद्रपूर मतदारसंघ ठरला होता. मात्र बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर हा मतदारसंघ कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या जागेसाठी बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आग्रही होते आणि त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर हे बोलूनही दाखवले होते. त्याचवेळी शिवानी वडेट्टीवार यांनी देखील तयारी सुरु केली होती. त्यांनी दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होत. प्रतिभा धानोरकरांचाही दिल्ली दौरा झाला होता. शेवटी रविवारी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मात्र यानंतर विजय वडेट्टीवारांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुलीला उमेदवारी नाकारल्यानंतर त्या प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करतील का, शिवानी वडेट्टीवारही प्रचारासाठी रस्त्यावर उतरतील का, असे अनेक प्रश्न आहेत. काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मुलीच्या राजकीय करिअरसाठी वडेट्टीवार दुसऱ्या कोणत्या मार्गाचा अवलंब करतील हे येत्या काळात समोर येईल. मात्र खासदारकी मिळाली नसली तर काँग्रेसमधून आमदारकीसाठी शिवाजी वडेट्टीवारांची वर्णी लागणार का? की यासाठी वडेट्टीवार भाजपचा पर्याय चाचपून पाहू शकतात? याची लवकरच स्पष्टता येईल.
चंद्रपूरातून प्रतिभा धानोरकर विरूद्ध सुधीर मुनगंटीवार…
लोकसभा लढवण्यासाठी फारसे उत्सुक नसलेले सुधीन मुनगंटीवार यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना रंगणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार हे 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे.