X: @therajkaran
देशभरात बहुप्रतिक्षित असलेल्या लोकसभा निवडणुका आज अखेर जाहीर झाल्या. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे बघितले जाते. निवडणूक मग ती कुठलीही असो, तिथे हायव्होल्टेज ड्रामा असणारच हे आपल्या देशात ठरलेले आहे. गेल्या दोन वर्षात झालेल्या शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) महाफुटीनंतर प्रथमच महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत, त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये मोठया प्रमाणावर हाय व्होल्टेज ड्रामा (High Voltage drama) बघायला मिळणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तारखा जाहीर केल्या. त्यामध्ये महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले. राज्यात एकूण ३५८ तालुके आणि ३६ जिल्ह्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात मिळून ४८ लोकसभा मतदारसंघ निर्माण होतात. प्रशासकीय दृष्टीने राज्यात कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर असे सहा तर भौगोलिकदृष्ट्या खानदेश, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असे भाग होतात. यासर्वच भागात मोठ्या प्रमाणावर प्रत्येक राजकीय पक्षांतून इच्छुकांची मांदियाळी असते. प्रतिस्पर्धी पक्षाला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी अनेक प्रकारचे हातखंडे वापरले जातात. मसल पॉवर, मनी पॉवर वापरत साम, दाम, दंड, भेद या चारही आयुधांचा सर्रास वापर करत देशभरात निवडणुका लढल्या जातात. महाराष्ट्र देखील यामध्ये कुठेच मागे नाही. त्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा होणार हे अपेक्षित आहेच.
निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार एकूण पाच टप्प्यात राज्यात मतदान होईल. १९ एप्रिलला पहिला टप्पा सुरू होईल. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा/गोंदिया, गडचिरोली/चिमूर आणि चंद्रपूर अशा पाच मतदारसंघात निवडणुका होतील. दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी पार पडेल. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, हिंगोली, यवतमाळ/वाशीम, नांदेड आणि परभणी असे आठ मतदारसंघ निवडणुकीला सामोरे जातील. असे दोन टप्प्यांचे मतदान एप्रिल महिन्यात पार पडेल.
मे महिन्यात तिसऱ्या टप्प्याचे मतदान रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी/सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले अशा एकूण अकरा मतदारसंघात घेतले जाईल. १३ मे रोजी होणारा चवथा टप्पा देखील अकरा मतदारसंघांचा असेल. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड हे मतदारसंघ येतील.
तर पाचवा आणि अंतिम टप्पा २० मे रोजी असेल. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे असे सात आणि मुंबईतील, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर – पश्चिम, मुंबई उत्तर- पूर्व, मुंबई उत्तर – मध्य, मुंबई दक्षिण – मध्य आणि मुंबई दक्षिण असे सहा मिळून एकूण तेरा मतदारसंघ निवडणुकीला सामोरे जातील.
खऱ्या अर्थाने आज निवडणुकीचा बिगुल फुंकला गेला आहे. ही रणधुमाळी आता संपुर्ण देशाबरोबरच राज्यात देखील सुरू होईल. येणारे दिवस हे मतदार राजाचे दिवस आहेत. त्यामुळे त्याने वाहवत न जाता डोळे उघडे ठेवून आणि सारासार विचार करून लोकशाही भक्कम करण्यासाठी मतदानाचा पवित्र हक्क बजावणे अपेक्षित आहे.