Twitter : @therajkaran
मुंबई
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शनिवारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मात्र आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांची पंरपरा ट्रिपल इंजिन सरकारने मोडीत काढली असून मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचा मु्क्काम हा सुभेदारी या शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र एकनाथ शिंदे यांचा मुक्काम ३२ हजार रूपये भाडे असलेल्या अलिशान हॉटेलमध्ये असणार आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यसरकारला चांगलाच धारेवर धरले आहे.
ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी. दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ? असा सवाल करत फाईव स्टार हॉटेल ३० रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री), ताज हॉटेल ४० रूम बुक (सर्व सचिव), अमरप्रीत हॉटेल ७० रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), अजंता अॅम्बेसेडर ४० रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), महसूल प्रबोधिनी १०० रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), पाटीदार भवन १०० (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – २० ( इतर अधिकारी) एकूण १५० गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद शहरातील देखील १५० गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत १ हजार ते दीड हजार असणार आहे.” यावरून दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ? असा तिखट सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.