Twitter : @therajkaran
मुंबई
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री असतील असे विधान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. वारंवार पक्षस बदलणारे नितेश राणे यांनी आधी मंत्री व्हावे, दुसऱ्याच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठवू नये, मी आहे त्याच पक्षात समाधानी आहे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांना सुनावले आहे.
वडेट्टीवार म्हणाले, “मी आहे त्या ठिकाणी समाधानी असून मला कोणाच्याही ऑफरची गरज नाही. पहिल्यांदा नारायण राणेंच्या सोबत काँग्रेसमध्ये आलो. त्यावेळी नारायण राणेंची भूमिका वेगळी होती. त्यावेळेस कॉग्रेसमध्ये रहाण्याचा निर्धार केला.
वडेट्टीवार म्हणाले, वारंवार पक्ष बदलण्याचा ज्यांना अनुभव आहे, त्यांच्या मुखातून असे वक्तव्य येणं स्वाभाविक आहे. वारंवार पक्ष बदलणाऱ्याना सत्ता महत्वाची वाटते. स्वतः सारखं इतरांकडे बघू नये. मी मात्र काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ शिपाई आहे. माझी काँग्रेसशी प्रामाणिक बांधिलकी आहे आणि म्हणूनच माझ्या हायकमांडने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे.
राणेंनी कोणती भूमिका स्वीकारावी हा त्यांचा प्रश्न आहे, असं म्हणत वडेट्टीवार म्हणाले, मी कायमच बहुजनांचा विचार केला आहे. मी बहुजनांचे प्रश्न घेऊन, बहुजनांचे विषय घेऊन लढत राहील. राज्यात तीन टग्याचें सरकार आहे, ते राज्याला अधोगतीकडे नेत आहे. त्याविरुद्ध लढण्यासाठी मी सशक्तपणे उभा आहे. मला कुणाच्याही ऑफरची गरज नाही. मला कोणताही पक्ष चॉकलेट देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्याचा चागंलाच समाचार घेतला.